Stock Market News : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. किंबहुना आज ही घसरण अधिकच तीव्र होती. आज सेन्सेक्स तब्बल १०१८ अंकांनी घसरला. तर, निफ्टीत ३०९.८० अंकांची घसरण झाली. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स २५०० अंकांनी घसरला आहे तर निफ्टीमध्ये ७५३ अंकांची घसरण झाली आहे. या घसरणीमागे काही महत्त्वाची कारणं आहेत.
गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचं सुमारे १८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४ फेब्रुवारी रोजी ४२६ लाख कोटी रुपयांवरून ४०८ लाख कोटी रुपयांवर आलं आहे.
परकीय भांडवलाचा आटत चाललेला ओघ, कमकुवत तिमाही निकाल, मंदावलेला आर्थिक विकास आणि डॉलरच्या तुलनेत देशांतर्गत चलनाची घसरण यासारख्या काही घटकांमुळं भारतीय शेअर बाजारात अलीकडं विक्रीचा दबाव आहे.
शेअर बाजारातील घसरणीची ५ प्रमुख कारणं सविस्तर…
अमेरिकेतील रोख्यांमधून मिळणारं वाढतं उत्पन्न, रुपयांच्या तुलनेत मजबूत झालेला डॉलर आणि फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता धूसर झाल्यामुळं परदेशी गुंतवणूकदार गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून भारतीय शेअर्सची विक्री करत आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) कॅश सेगमेंटमध्ये १२,६४३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. ऑक्टोबरपासून त्यांनी भारतीय शेअर बाजारातून २.७५ लाख कोटी रुपये काढून घेतले आहेत.
भारतीय कंपन्यांचं डिसेंबर तिमाहीचं उत्पन्न गेल्या दोन तिमाहींच्या तुलनेत किंचित चांगलं आहे. मात्र, ते अपेक्षेची पूर्तता करण्यात अपयशी ठरलं आहे, त्यामुळं चिंता वाढली आहे. सरकारचा भांडवली खर्च, निवडणुका आणि हवामानात लक्षणीय बदल झाल्यानं तिसऱ्या तिमाहीचं उत्पन्न गेल्या दोन तिमाहींच्या तुलनेत किंचित चांगलं राहिलं आहे. मात्र, मूल्यांकनाच्या तुलनेत, कमाई निराशाजनक आहे. कन्झ्युमर स्टेपल्स, ऑटो आणि बिल्डिंग मटेरिअल क्षेत्रानं मोठी निराशा केली आहे, तर स्पेशालिटी केमिकल्स हुशारीनं सावरताना दिसत आहेत,' असे मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे सहसंस्थापक प्रमोद गुब्बी यांनी 'मिंट'ला सांगितलं.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरणारं मूल्य हे परकीय भांडवल बाहेर जाण्यास आणि बाजारात नकारात्मक भावना पसरवण्यात प्रमुख कारणं ठरलं आहे. देशांतर्गत चलन सोमवारी ८८ च्या पातळीवर घसरलं आणि या वर्षी डॉलरच्या तुलनेत जवळपास ३ टक्क्यांनी घसरलं. व्यापारयुद्धामुळं रुपयाची घसरण अधिक लांबू शकते असंही बोललं जात आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या हस्तक्षेपाच्या शक्यतेमुळं मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ६१ पैशांनी वधारून ८६.८४ वर पोहोचला.
तज्ञांच्या मते अलीकडच्या करेक्शननंतरही भारतीय शेअर बाजार अजूनही महाग आहे आणि उत्पन्नाच्या आघाडीवर कमकुवत अपेक्षांमुळे नकारात्मक भावना आहे. मूल्यांकन जास्त असून उत्पन्न लवकर वाढण्याची शक्यता नाही, असं प्रमोद गुब्बी यांचं मत आहे.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे चीफ इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजिस्ट व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, लार्ज कॅपमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी सातत्यानं केलेल्या विक्रीमुळं त्यांचं मूल्यांकन योग्य झालं आहे, तर मिड आणि स्मॉल कॅपचं मूल्यांकन अजूनही जास्त आहे.
भारतीय शेअर बाजार हा जगातील सर्वात महागडा शेअर बाजार आहे आणि त्याच्या मूल्यांकनाचं समर्थन होऊ शकत नाही, असं मूल्यांकन गुरू अश्वथ दामोदरन यांचं मत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी भागीदारांवर अनेक शुल्कांची घोषणा केली आहे. त्यामुळं व्यापक व्यापार युद्ध भडकण्याची चिंता वाढली आहे. त्यातून जागतिक आर्थिक विकासाला खीळ बसू शकते आणि महागाई वाढू शकते.
ट्रम्प यांनी सोमवारी पोलाद आणि अॅल्युमिनियम आयातीवर २५ टक्के शुल्क लादलं असून त्याचा सर्वाधिक फटका कॅनडा आणि मेक्सिकोला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या शुल्कांबाबतची अनिश्चितता आणि त्याचा जागतिक आर्थिक वाढीवर होणारा परिणाम यामुळं गुंतवणूकदार जोखमीच्या शेअर्सबाबत सावध झाले आहेत. सध्याच्या अमेरिकी प्रशासनात धोरणात्मक निश्चिततेचा अभाव आहे आणि हाच धोका गुंतवणूकदारांना सहन करावा लागणार आहे.
दौलत फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण फतेहपुरिया म्हणाले की, पुढील चार वर्षे सार्वजनिक बाजारातील गुंतवणूकदारांसाठी अस्थिर परंतु रोमांचक काळ असणार आहे.
संबंधित बातम्या