Stock Market Holiday News : शेअर बाजारात ट्रेडिंग व गुंतवणूक करणाऱ्यांनी बाजारातील घडामोडींबरोबरच सुट्ट्यांविषयी सजग असणं गरजेचं आहे. त्यामुळं गुंतवणुकीचे निर्णय घेणं सोपं जातं. आजपासून सुरू झालेल्या ऑक्टोबर महिन्यात काही दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. कोणते आहेत हे दिवस जाणून घेऊया…
महात्मा गांधी यांच्या जयंतीचं (Gandhi Jayanti) औचित्य साधून मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे दोन्ही भारतीय शेअर बाजार उद्या, २ ऑक्टोबर रोजी बंद राहतील. मुंबई शेअर बाजाराच्या वेबसाइटनुसार, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, करन्सी, एसएलबी, कमोडिटी आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट (EGR) सेगमेंटमधील व्यवहार २ ऑक्टोबर रोजी बंद राहतील.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या हॉलिडे कॅलेंडरमध्ये २ ऑक्टोबरला इक्विटीसाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२ ऑक्टोबर २०२४ - गांधी जयंती
१ नोव्हेंबर २०२४ - दिवाळी
१५ नोव्हेंबर २०२४ - गुरु नानक जयंती
२५ डिसेंबर २०२४ - ख्रिसमस
भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी गेल्या आठवड्यात आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली. सेन्सेक्स आणि निफ्टी ५० या बेंचमार्क निर्देशांकांनी शुक्रवारी सर्वकालीन विक्रम मोडीत काढत नवी पातळी गाठली.
गेल्या आठवड्यातही सेन्सेक्सनं ८५,००० चा टप्पा ओलांडला. ट्रेडर्स आणि विश्लेषक याकडं एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहत आहेत. या कामगिरीमुळं सेन्सेक्स आणि निफ्टीनं आणखी एक टप्पा गाठला असून एक लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता वाढली आहे, असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी निफ्टी ५० नं २६,२७७ चा उच्चांक गाठला होता. मात्र, दिवसभरात तो ३७ अंकांनी घसरून २६,१७९ वर बंद झाला. सेन्सेक्स काही अंकांनी घसरून दिवसअखेर ८४३६५.३२ अंकांवर बंद झाला. आज सेन्सेक्समध्ये किंचित वाढ झाली आहे. तर, निफ्टीमध्ये किंचित घसरण दिसत आहे.
मजबूत आर्थिक अंदाज, जागतिक बाजारपेठेमधील उत्साह, सहाय्यक पतधोरणे आणि वाढती देशांतर्गत गुंतवणूक यासह अनेक घटकांमुळं बाजारातील तेजी वाढत आहे. सकारात्मक आर्थिक दृष्टीकोनामुळं अलीकडच्या वर्षांत देशांतर्गत आवक लक्षणीय वाढली आहे, इक्विटी बाजारातील वाढत्या किरकोळ सहभागामुळं पुरेशी तरलता आणि स्थिर मागणी निर्माण झाली आहे.