Stock Market Crash : एका दिवसात ७ लाख कोटी बुडाले! का पडला शेअर बाजार? जाणून घ्या ५ कारणं
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market Crash : एका दिवसात ७ लाख कोटी बुडाले! का पडला शेअर बाजार? जाणून घ्या ५ कारणं

Stock Market Crash : एका दिवसात ७ लाख कोटी बुडाले! का पडला शेअर बाजार? जाणून घ्या ५ कारणं

Jan 21, 2025 04:37 PM IST

Why Share Market Down Today : भारतीय शेअर बाजारात मंगळवारी जणू सेल लागला होता. विक्रीचा मोठा जोर असल्यामुळं दिवसभरात सेन्सेक्स १२३५ अंकांनी तर निफ्टी ३२० अंकांनी कोसळला. काय आहेत या घसरणीची कारणं? जाणून घेऊया...

Share Market Down : एका दिवसात ७ लाख कोटींचा बुडाले! का पडला शेअर बाजार? जाणून घ्या ५ कारणं
Share Market Down : एका दिवसात ७ लाख कोटींचा बुडाले! का पडला शेअर बाजार? जाणून घ्या ५ कारणं

Share Market Updates : भारतीय शेअर बाजारात आज जणू 'सेल' लागला होता. विक्रीच्या मोठ्या सपाट्यामुळं दिवसभरात सेन्सेक्स १२३५ अंकांनी तर, निफ्टी ३२० अंकांनी गडगडला. या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं तब्बल ७ लाख कोटींहून अधिक नुकसान झालं. या घसरणीमागे अनेक कारणं आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) १.६० टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) १.३५ टक्क्यांनी घसरला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये आज प्रत्येकी २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. आजच्या घसरणीमुळं सेन्सेक्सवर सूचीबद्ध कंपन्यांचं एकूण बाजार भांडवली मूल्य मागील सत्रातील ४३२ लाख कोटींवरून तो सुमारे ४२५.५ लाख कोटींवर आलं आहे. याचाच अर्थ गुंतवणूकदारांना ७ लाख कोटींहून अधिक फटका बसला आहे.

शेअर बाजारातील घसरणीची ५ मोठी कारणं पुढीलप्रमाणे…

डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ वाढीचा इशारा

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार स्थापन झालं आहे. सत्तेत परतताच ट्रम्प यांनी १ फेब्रुवारीच्या आधी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के शुल्क लागू करण्याचे संकेत दिले. याशिवाय चीनसह ब्रिक्स देशांवर अतिरिक्त टॅरिफ (आयात निर्यातीवरील शुल्क किंवा कर) लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

अर्थसंकल्प २०२५ च्या आधी गुंतवणूकदार सावध

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. गुंतवणूकदारांच्या नजरा २०२५ च्या अर्थसंकल्पावर आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करणार आहेत. आर्थिक समतोल राखून सरकार उपभोग वाढवण्यासाठी, ग्रामीण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि उत्पादन आणि पायाभूत सुविधांना समर्थन देण्यासाठी उपाययोजना जाहीर करेल, अशी अपेक्षा जास्त आहे. तथापि, एखादा अपेक्षाभंग आधीच डामाडोल असलेल्या बाजारभावनेला आणखी धक्का देऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध झाले आहेत.

विदेशी गुंतवणूकदारांची नफावसुली

रुपयाच्या तुलनेत मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर आणि रोख्यांतून मिळणाऱ्या वाढीव उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी (FPIs) विक्रीचा सपाटा लावला आहे. अलीकडच्या काही महिन्यांत भारतीय शेअर बाजारातील घसरणीमागे हे एक प्रमुख कारण आहे. जानेवारी महिन्यात २ जानेवारी वगळता विदेशी गुंतवणूकदारांनी दररोज भारतीय शेअर्सची विक्री केली असून २० जानेवारीपर्यंत सुमारे ५१ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.

निराशाजनक तिमाही निकाल

सध्या कंपन्या चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनी गुंतवणूकदारांना निराश केलं आहे. आधीच्या दोन तिमाहीप्रमाणेच या तिमाहीचे निकालही आतापर्यंत तरी फारसे प्रभावी दिसलेले नाहीत. त्यातून बाजारात नकारात्मक संदेश गेला आहे.

अर्थव्यवस्थेबाबत चिंता

भारतीय अर्थव्यवस्था मूलभूतरित्या उत्तम कामगिरी करत असली तरी आर्थिक उलाढाल मंदावल्यामुळं उद्योगांचं उत्पन्न घटलेलं दिसत आहे. ICICI प्रुडेन्शियल AMC च्या फंड मॅनेजर प्रियंका खंडेलवाल यांनी मिंटला दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार हा उत्पन्न आणि प्रवाहाचा मागोवा घेतो. भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत होण्याची चिन्हं दिसत आहेत, त्यामुळं बाजारात सावध वातावरण निर्माण झालं आहे. सध्या बाजारातील मागणी व्यापक वाढ होताना दिसत नाही. सरकारी भांडवली खर्चही मंदावला आहे आणि त्यामुळं बिगरशेती रोजगाराला धक्का बसत आहे. या साऱ्यामुळं धोरणात्मक हस्तक्षेप होत असतानाही आपण मंदीसारख्या स्थितीत आहोत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner