Stock Market Updates : संरक्षण क्षेत्रातील सरकारी कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा शेअर सध्या गुंतवणूकदारांच्या रडारवर आहे. या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीला मिळालेला महारत्न कंपनीचा दर्जा यासाठी कारणीभूत ठरला आहे. सध्या हा शेअर दीड टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बीएसईवर ४४४६.८५ रुपयांवर बंद झाला होता. आज त्यात मोठी वाढ झाली आहे. सकाळी १०.३५ वाजत हा शेअर १.३३ टक्के वाढून ट्रेड करत आहे. सध्या कंपनीच्या शेअरचा भाव ४५०५.५० रुपये आहे.
महारत्न कंपन्यांच्या यादीत समावेशाचा मान मिळालेली हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड ही १४ वी कंपनी आहे. या ग्रुपमध्ये एनटीपीसी, ओएनजीसी, सेल, भेल अशा मोठ्या कंपन्या आहेत. महारत्न कंपन्यांना तुलनेनं अधिक स्वातंत्र्य असतं. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सरकारच्या परवानगीशिवाय कोणत्याही एका प्रकल्पात ५००० कोटी रुपये किंवा नेटवर्थच्या १५ टक्के गुंतवणूक करू शकणार आहे. तसंच, कंपनीला अधिग्रहणाचं अधिक स्वातंत्र्य असेल.
‘चॉइस ब्रोकिंग’शी संबंधित सुमित बगडिया म्हणतात, 'एचएएलचे शेअर्स टेक्निकल चार्ट पॅटर्नवर मजबूत दिसत आहेत. ज्यांच्याकडं सध्या या कंपनीचे शेअर्स आहेत, त्यांनी अल्पमुदतीसाठी होल्ड करून ठेवावेत, असा सल्ला बागडिया यांनी दिला आहे. स्टॉप लॉस ४३०० चा लावावा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
गेल्या वर्षभरात या कंपनीनं शेअर बाजारात १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. ६ महिने शेअर ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांना २४ टक्के परतावा मिळाला आहे. मागचा महिना गुंतवणूकदारांसाठी फारसा चांगला गेला नाही. या दरम्यान हा शेअर जवळपास २ टक्क्यांनी घसरला आहे. एचएएलचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५,६७५ रुपये आहे.
संबंधित बातम्या