Energy Stock News : हरित ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनी स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जीचा शेअर आज प्रचंड तेजीत होता. आज हा शेअर ५.६० टक्क्यांनी उसळला. गुजरातमधून कंपनीला मिळालेले १२०० कोटी रुपयांचं कंत्राट हे या तेजीमागचं प्रमुख कारण आहे.
स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जीनं कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार कंपनीला १२०० कोटी रुपयांच्या कामाचं इरादापत्र (LOI) मिळालं आहे. ही माहिती सार्वजनिक होताच आज बीएसईवर कंपनीचा शेअर ६ टक्क्यांहून अधिक तेजीसह ४७१ रुपयांवर उघडला. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअरची किंमत ८ टक्क्यांनी वाढून ४७९.७३ रुपये झाली. दिवसअखेर हा शेअर ५.६० टक्क्यांच्या वाढीसह ४६८ रुपयांवर स्थिरावला.
स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जी ही जागतिक कंपनी आहे. ही कंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी बांधकाम, अभियांत्रिकी आणि खरेदी सेवा पुरवते. कंपनीचा पोर्टफोलिओ २०.७ गिगावॉट आहे. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जीचा व्यवसाय भारताव्यतिरिक्त दक्षिण आशिया, मध्य पूर्व, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही पसरला आहे.
स्टर्लिंगच्या शेअरमध्ये आज तेजी दिसत असली तरी गेल्या महिन्याभरात या शेअर २.५ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. स्टर्लिंग अँड विल्सन रिन्यूएबल एनर्जीचे शेअर्स ६ महिन्यांत ३७ टक्क्यांनी घसरले आहेत. एका वर्षात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना केवळ ६ टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८२८ रुपये आहे. आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांक ४२४.५५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १०,९१०.०२ कोटी रुपये आहे.
बीएसईच्या आकडेवारीनुसार, कंपनीनं केवळ एकदाच लाभांश दिला. कंपनीनं २०२० मध्ये हा लाभांश दिला होता. त्यावेळी कंपनीनं पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ६ रुपये लाभांश दिला होता.
संबंधित बातम्या