प्रीमियर एनर्जीजचं शेअर बाजारात दणक्यात पदार्पण! पहिल्याच दिवशी शेअरमध्ये तुफानी वाढ, गुंतवणूकदार खूष-stellar listing premier energies shares debut at rs 990 up 120 from ipo price ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  प्रीमियर एनर्जीजचं शेअर बाजारात दणक्यात पदार्पण! पहिल्याच दिवशी शेअरमध्ये तुफानी वाढ, गुंतवणूकदार खूष

प्रीमियर एनर्जीजचं शेअर बाजारात दणक्यात पदार्पण! पहिल्याच दिवशी शेअरमध्ये तुफानी वाढ, गुंतवणूकदार खूष

Sep 03, 2024 01:03 PM IST

Premier Energies IPO Listing : प्रीमियर एनर्जीजच्या शेअरनं अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारात दणदणीत एन्ट्री घेतली आहे. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी भरघोस कमाई केली आहे.

Premier Energies IPO listing
Premier Energies IPO listing

Premier Energies share price : प्रीमियर एनर्जीजच्या शेअरनं आज शेअर मार्केटमध्ये दमदार पदार्पण केलं. आयपीओ किंमत ४५० रुपये असलेला हा शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी एनएसईवर ९९० रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर, बीएसईवर ९९१ रुपयांवर लिस्ट झाला. म्हणजेच गुंतवणूकदारांना सुमारे १२० टक्के नफा झाला. त्यामुळं गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

सोलर सेल आणि मॉड्यूल उत्पादक कंपनी प्रीमियर एनर्जीजचा २८३०.४० कोटींचा आयपीओ २७ ऑगस्ट २०२४ ते २९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सब्सक्रिप्शनसाठी खुला होता. आयपीओ लाँच करण्यापूर्वी प्रीमियर एनर्जीजनं अँकर गुंतवणूकदारांकडून ८४६ कोटी रुपये गोळा केले होते. 

कसा होता आयपीओला प्रतिसाद?

आयपीओला जोरदार सब्सक्रिप्शन मिळालं. हा आयपीओ एकूण ७५ पट सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणुकदारांच्या कोट्यात ७.४४ पट, तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या कोट्यात ५०.९८ पट सब्सक्रिप्शन मिळालं. पात्र संस्थात्मक खरेदीदार (QIB) श्रेणीत २१२.४२ पट आणि कर्मचारी श्रेणीत ११.३२ पट सब्सक्रिप्शन मिळालं.

प्रीमियर एनर्जीजच्या आयपीओमध्ये २.८७ कोटी शेअर नव्यानं विक्रीस काढण्यात आले होते. त्या माध्यमातून १,२९१.४० कोटी रुपये जमा झाले, तसेच ३.४२ कोटी शेअर ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत वितरीत करण्यात आले. त्यातून एकूण १,५३९.०० कोटी रुपये मिळाले. ओएफएस अंतर्गत साऊथ एशिया ग्रोथ फंड २ होल्डिंग्स एलएलसी (एसएजीएफ २) नं २.६८ कोटी इक्विटी शेअर्स, साऊथ एशिया ईबीटी ट्रस्टनं १,७२,८०० शेअर्स आणि प्रवर्तक चिरंजीव सिंग सलूजा यांनी ७२ लाख शेअर्सची विक्री केली. 

प्रवर्तकांचा हिस्सा किती?

आयपीओनंतर कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ७२.२३ टक्के आहे, तर एसएजीएफ-२ च्या मालकीच्या शेअर्ससह सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडं २६.१२ टक्के हिस्सा आहे. अतिरिक्त १.६५ टक्के शेअर्स कर्मचारी ट्रस्टकडे आहेत.

काय करते कंपनी?

एप्रिल १९९५ मध्ये स्थापन झालेली प्रीमियर एनर्जीज लिमिटेड सौर ऊर्जा उद्योगातील एक प्रमुख कंपनी आहे. एकात्मिक सौर सेल आणि पॅनेलच्या उत्पादनात कंपनीचा हातखंडा आहे. कंपनीच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांमध्ये ईपीसी (अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) आणि ओ अँड एम (ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स) सेवांसह मोनोफेशियल आणि बायफेशियल सौर मॉड्यूलचा समावेश आहे. प्रीमियर एनर्जी हैदराबाद आणि तेलंगणामध्ये पाच अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प चालवते.

कंपनीची आर्थिक कामगिरी कशी आहे?

प्रीमियर एनर्जीजनं आर्थिक वर्ष २०२१ ते २०२३ दरम्यान ऑपरेटिंग महसुलात ४२.७१ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर (CAGR) नोंदविला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीच्या व्यवसायानं वेग घेतला आणि महसूल १२० टक्क्यांनी वाढून ३,१४३ कोटी रुपयांवर पोहोचला. हे वर्ष कंपनीसाठी जोरदार ठरलं. कंपनीनं २३१ कोटी रुपयांचा मजबूत नफा कमावला. मागील वर्षीच्या १३.३ कोटी रुपयांचा तोटा भरून काढत कंपनीनं ही मजल मारली.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग