Standard Glass Lining IPO : स्टँडर्ड ग्लास लाइनिंग कंपनीचा आयपीओ आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आणि अवघ्या एका तासातच हा आयपीओ ओव्हर सबस्क्राइब झाला. किरकोळ आणि बिगर संस्थात्मक श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून या आयपीओला उदंड प्रतिसाद मिळाला.
सध्या हा आयपीओ १.८२ पट सबस्क्राइब झाला आहे. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या श्रेणीत आयपीओला २.४६ पट सबस्क्रिप्शन मिळालं आहे तर, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी हा आयपीओ २.७३ पट सबस्क्राइब केला आहे.
आयपीओच्या माध्यमातून १,२५० कोटी रुपये उभारण्याचं स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचं उद्दिषट आहे. यात २१० कोटींचे नवीन इक्विटी शेअर्स आणि १.४२ कोटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर (OFS) आहे. हा आयपीओ ८ जानेवारीपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहील. आयपीओ आणण्याआधी कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून १२३ कोटी रुपये यशस्वीरित्या मिळवले.
आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणारा निधी यंत्रसामग्री संपादनासाठी भांडवली खर्च, कर्ज परतफेड, कंपनीच्या पूर्ण मालकीच्या S2 अभियांत्रिकी उद्योगातील गुंतवणूक, अजैविक वाढीसाठी धोरणात्मक गुंतवणूक आणि सामान्य कॉर्पोरेट आवश्यकता यासह विविध उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.
कंपनीनं आयपीओमध्ये प्रति शेअर १३३ ते १४० असा दरपट्टा निश्चित केला आहे. एका लॉटमध्ये किमान १०७ शेअर्स आणि त्याच्या पटीत अतिरिक्त गुंतवणूक करता येणार आहे.
स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचा शेअर ग्रे मार्केटमध्ये ९३ रुपयांच्या प्रीमियमवर आहे. याचा अर्थ इश्यू किमतीपेक्षा ६९ टक्क्यांनी जास्त किंमतीवर लिस्ट होण्याचे संकेत मिळतात.
इकॉनॉमिक टाइम्सच्या एका वृत्तानुसार, भौगोलिक विस्तार आणि उत्पादनाच्या वैविध्यामुळं मध्यम मुदतीत २० ते २५ टक्क्यांच्या अपेक्षित महसुली वाढीसह मजबूत वाढीची शक्यता गृहित धरत बाजार विश्लेषकांनी हा आयपीओ सबस्क्राइब करण्याची शिफारस केली आहे.
एसबीआय कॅपिटल सिक्युरिटीजनं देखील दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीनं आयपीओ सबस्क्राइब करण्याची शिफारस केली आहे. स्टँडर्ड ग्लास लाइनिंग IPO च्या शेअर वाटपाची प्रक्रिया ९ जानेवारी रोजी संपेल, तर कंपनीचे शेअर्स १३ जानेवारी रोजी ट्रेडिंग सुरू करणार आहेत.
फार्मास्युटिकल आणि रासायनिक उद्योगांसाठी भारतातील टॉप पाच विशेष अभियांत्रिकी उपकरण उत्पादकांमध्ये स्टँडर्ड ग्लास लाइनिंगचा क्रमांक लागतो. कंपनी टर्नकी प्रकल्पांद्वारे फार्मास्युटिकल आणि केमिकल उत्पादकांसाठी ऑपरेशनल प्रोटोकॉल स्थापित करण्याबरोबरच डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन, असेंब्ली, इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग सेवा समाविष्ट करून एन्ड-टू-एन्ड सोल्यूशन्स ऑफर करते. ग्लास-लाइन इक्विपमेंट (GLE) क्षेत्रात विविध कारणामुळं मजबूत वाढीची अपेक्षा आहे.
कंपनीनं आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ऑपरेशनल महसुलात वर्ष-दर-वर्षात ९ टक्के वाढ नोंदवली असून महसुलाचा आकडा ५४४ कोटींवर गेला आहे. तर, करानंतरचा नफा १३ टक्क्यांनी वाढून ६० कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या सहा महिन्यांत कंपनीनं ३०७ कोटी रुपयांचा महसूल आणि ३६ कोटी रुपयांचा नफा मिळवला.
संबंधित बातम्या