Sri Adhikari Brothers Share Price : सब टीव्हीची संस्थापक व ५,५०० तासांची लायब्ररी असलेल्या सर्वात मोठ्या कंटेन्ट हाऊसपैकी असलेल्या श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेडनं शेअर बाजारात आपली छाप सोडली आहे. या कंपनीच्या शेअरनं गेल्या वर्षभराच्या कालावधीत गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा मिळवून दिला आहे. या कंपनीचे गुंतवणूकदार एका वर्षात करोडपती झाले आहेत.
श्री अधिकारी ब्रदर्सचा शेअर २०२४ च्या सुरुवातीला अवघ्या ३.७५ रुपयांवर होता. फेब्रुवारी २०२५ मध्ये शेअरनं ३९० रुपयांच्या पातळीवर झेप घेतली आहे. या वाढीमुळं गुंतवणूकदाराची वर्षभरात एक लाख रुपयांची गुंतवणूक १.०४ कोटी रुपयांवर गेली आहे.
बीएसईच्या वेबसाईटवरून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १२ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर २१९७.७० रुपयांवर तर, २ एप्रिल २०२४ रोजी ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ४१.५७ रुपयांवर पोहोचला. श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्कचं बाजार भांडवल १ फेब्रुवारी २०२५ रोजी बाजार बंद होईपर्यंत ९८१.४३ कोटी रुपये होतं.
हा मल्टिबॅगर पेनी स्टॉक महिनाभरात उताराला लागला असून त्यात सुमारे ७० टक्के घसरण झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये २ टक्के घसरण झाली असून गुंतवणूकदारांना शून्य परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून बेस बिल्डिंग मोडमध्ये असूनही श्री अधिकारी ब्रदर्सचे शेअर्स भारतीय शेअर बाजारानं वर्षभरात दिलेल्या मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहेत. वर्षभराच्या कालावधीत हा मल्टिबॅगर स्टॉक ८०० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. गेल्या ५ वर्षांत हा शेअर २९,९५० टक्क्यांनी वधारला आहे.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क ही कंपनी ३० वर्षांहून अधिक काळ बहुभाषिक व वैविध्यपूर्ण कंटेन्टची निर्मिती करीत आहे. मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू आणि कन्नड सारख्या प्रादेशिक भाषांमध्ये कंपनीनं मजबूत जम बसवला आहे.
कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, 'आजच्या डायनॅमिक मीडिया लँडस्केपमध्ये डिजिटल मीडियाच्या संधींची वाढ लक्षात घेता, कंपनी शॉर्ट आणि लाँग फॉरमॅट कंटेंट, म्युझिक अल्बम, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट, इंटरनेट ब्रॉडकास्टिंग इत्यादी विविध डिजिटल मीडिया आयपी तयार करण्याची योजना आखत आहे.
२०२४-२५ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा ८.९७ लाख रुपयांवर आला आहे, जो मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत ५.४० कोटी रुपये होता. कंपनीच्या शेअरमध्ये आज सुद्धा एनएसईवर ४.९९ टक्क्यांची घसरण झाली.
संबंधित बातम्या