दसऱ्यानंतर सोयाबीनचे दर अद्याप वधारलेले नसल्याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनला हवा तसा रेट मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अद्याप घरातच ठेवला आहे. राज्यात विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये सोयाबीनला सरासरी प्रती क्विंटल क्विंटल ४ हजार ३०० रुपये ते ४ हजार ८०० रूपये दर मिळात आहे. विदर्भात काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर असे होतेःअंजनगाव सुर्जी किमान दर रु ४०००, कमाल दर रु. ४,४००; वरोरा किमान दर रु ३,०००, कमाल दर रु. ४,३००; बुलढाणा किमान दर रु. ४,०००, कमाल दर रु. ४,६०० रुपये होेते.
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून संकटे सुरूच आहेत. त्यात बाजारात भाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनातून मूळ उत्पादन खर्चही काढता आलेला नाही.सोयाबीनचा बाजार मागील तीन महिन्यांपासून प्रती क्विंटल ५ हजार रुपयांच्या खाली आला आहे. एरवी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सोयाबीनच्या दरात काहीशी तेजी पाहायला मिळत असते. मात्र हंगाम सुरू झाल्यानंतर भावपातळी कमी होते. पण यंदा मागील तीन महिन्यांपासून सोयाबीन बाजारात हंगामातील निचांकी पातळीवर आहे.
यंदा राज्यात सोयाबीन उत्पादनात घट झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनची उत्पादकता एकरी ३० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे सोयाबीनचा एकरी उतारा ८ ते ९ क्विंटल येत असतो. परंतु काही भागात यंदाच्या हंगामात हाच उतारा ४ ते ५ क्विंटलपर्यंत खाली आला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या तीनही महत्त्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा पिकाला फटका बसला.
केंद्र सरकारने २०२३-२४ च्या खरीप हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमती- (MSP-Minimum Support Prices) जाहीर केल्या होत्या. २०२३-२४ या हंगामासाठी सोयाबीनची आधारभूत किंमत प्रति क्विंटल ४६०० रूपये जाहीर करण्यात आली होती. गेल्या हंगामात ती ४३०० रूपये होती.
सोयाबीनचे भाव सोया पेंड आणि सोया तेल यावर अवलंबून असतात. परंतु राज्य सरकारने सोयाबीनच्या आयातीवर शुल्क मोठ्या प्रमाणावर कमी केले आहे. सरकारने आयात शुल्क ३५ टक्क्यावरून कमी करून ते ५ टक्क्यावर आणले आहेत. त्यामुळे देशात खाद्यतेलाची विक्रमी आयात झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खाद्यतेलाची २२ टक्के आयात जास्त झाली आहे. नोव्हेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ यादरम्यान १५५ लाख टन खाद्यतेल आयात करण्यात आले. पूर्वीच्या वर्षात याच कालावधीत सरकारने १२७ लाख टन खाद्यतेल आयात केले होते. म्हणजे यंदा २८ लाख टन खाद्यतेल जास्त आयात करण्यात आले आहे. देशात खाद्यतेलाचा अतिरिक्त स्टॉक निर्माण झाल्याने खाद्यतेलाचे भाव पडल्याचं तेल बाजार अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत.
संबंधित बातम्या