Waaree Engergies share price : सोलर कंपनी वारी एनर्जीजच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. वारी एनर्जीजचा शेअर बुधवारी ७ टक्क्यांनी वधारून ३,७४०.७५ रुपयांवर पोहोचला आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.
वारी एनर्जीजचे शेअर्स २८ ऑक्टोबर २०२४ रोजी बाजारात सूचीबद्ध झाले. लिस्टिंगच्या दिवसापासून आजपर्यंत ७ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये १४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअरमध्ये १६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. आज पुन्हा उसळी मारत शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
वारी एनर्जीजचा आयपीओ २१ ऑक्टोबर २०२४ रोजी खुला झाला होता. तो २३ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिला. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत १५०३ रुपये होती. वारी एनर्जीजचा शेअर २८ ऑक्टोबर रोजी बीएसईवर २५५० रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगच्या दिवशी बीएसईवर कंपनीचा शेअर २३३६.८० रुपयांवर बंद झाला. वारी एनर्जीजचे शेअर बीएसईवर ६७ टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर सूचीबद्ध झाले.
वारी एनर्जीजचे समभाग गेल्या पाच दिवसांत ४७ टक्क्यांनी वधारले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २५३६.७० रुपयांवर होता. ६ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ३७४०.७५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन दिवसांत वारी एनर्जीजच्या शेअरमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स २७६० रुपयांवरून ३७०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
वारी एनर्जीजचा आयपीओ एकूण ७९.४४ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ११.२७ पट सब्सक्राइब झाला होता. तर कर्मचारी प्रवर्गातील हिस्सा ५.४५ पट होता. कंपनीच्या आयपीओला नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (एनआयआय) श्रेणीत ६५.२५ पट सब्सक्रिप्शन मिळाले. त्याचबरोबर पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा २१५.०३ पट सबस्क्राइब करण्यात आला.