NTPC IPO News in Marathi : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात एनटीपीसीचे ग्रीन एनर्जी युनिट असलेल्या एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ आज, १९ नोव्हेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला. पहिल्याच दिवशी हा आयपीओ ३३ टक्के सब्सक्राइब झाला आहे. रिटेल श्रेणीत हा आयपीओला चांगला प्रतिसाद मिळाला.
बीएसईने दिलेल्या माहितीनुसार, आयपीओमध्ये ५९,३१,६७,५७५ शेअर्सच्या तुलनेत १८,२२,३७,१४२ शेअर्ससाठी बोली लावण्यात आली होती. या ऑफरसाठी प्राइस बँड १०२ ते १०८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदार २२ नोव्हेंबरपर्यंत या आयपीओसाठी अर्ज करू शकतात. ग्रे मार्केटमध्ये हा शेअर १ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे.
एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ १० हजार कोटी रुपयांचा आहे आणि ९२.५९ कोटी शेअर्स नव्यानं विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदार किमान १३८ शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. एनटीपीसी ग्रीन एनर्जी आयपीओ शेअर अलॉटमेंट प्रक्रिया २५ नोव्हेंबर रोजी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट होतील. एनटीपीसीग्रीन एनर्जी शेअर्सची संभाव्य लिस्टिंग डेट २७ नोव्हेंबर आहे. केएफआयएन टेक्नॉलॉजीज लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. आयडीबीआय कॅपिटल मार्केट सर्व्हिसेस लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड या कंपन्यांचे प्रमुख व्यवस्थापक आहेत.
आर्थिक वर्ष २०२६-२७ पर्यंत सौर आणि पवन ऊर्जेमध्ये १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. या गुंतवणुकीपैकी २० टक्के गुंतवणूक इक्विटीतून होणार आहे. याशिवाय आयपीओच्या माध्यमातून १० हजार कोटी रुपयांचा निधी येणार आहे. उर्वरित रक्कम कंपनी अंतर्गत उभारणार आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीची स्थापित क्षमता सध्या ३,२२० मेगावॅट आहे. मार्च २०२५ पर्यंत ते ६ हजार मेगावॅट आणि २०२६ पर्यंत ११ हजार मेगावॅटपर्यंत वाढवण्याची कंपनीची योजना आहे. एनटीपीसी ग्रीन एनर्जीला स्वत:ला केवळ वीजनिर्मितीपुरते मर्यादित ठेवायचे नाही. कंपनीने ग्रीन हायड्रोजन, पंप स्टोरेज पॉवर आणि एनर्जी स्टोरेजची योजना आखली आहे.