Sokudo Launches 3 Electric Scooters: सोकुडो इलेक्ट्रिकने भारतीय बाजारात तीन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. ज्यात सोकुडो सिलेक्ट २.२, सोकुडो रॅपिड २.२ आणि सोकुडो प्लस यांचा समावेश आहे. नवीन मॉडेल्स फेम २ मानकांचे पालन करतात आणि स्मार्ट फायरप्रूफ लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी आणि चार्जिंगसाठी १५ एएमपी कन्व्हर्टरची सुविधा आहे. विशेष म्हणजे, प्लस ही स्लो स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर असल्याने त्याची आरटीओकडे नोंदणी करण्याची गरज नाही.
१०० किलोमीटरपर्यंतची रेंज असलेल्या सिलेक्ट २.२ ची एक्स- शोरूम किंमत ८५ हजार ८८९ रुपये इतकी आहे. रॅपिड २.२ ची एक्स- शोरूम किंमत ७९ हजार ८८९ रुपये आहे, ही स्कूटर एका चार्जमध्ये १०५ किलोमीटर अंतर गाठेल. तर, सोकुडो प्लसची एक्स- शोरूमची किंमत ५९ हजार ८८९ रुपये आहे. इलेक्ट्रिक स्कूटर एबीएस प्लास्टिक बॉडीपासून बनलेल्या आहेत ज्याची रुंदी ३.५ मिमी ते ५.२५ मिमीदरम्यान आहे. बॅटरी पॅकवर तीन वर्षांची वॉरंटी आणि गाडीवर पाच वर्षांची वॉरंटी आहे.
२०२३ मध्ये विक्रीत ३६ टक्के वाढ झाल्याचे निर्मात्याचे म्हणणे आहे. लाँचिंगनंतर कंपनीला अंदाज आहे की, नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स १५-२० टक्के बाजारपेठ काबीज करतील. सोकुडो इलेक्ट्रिक इंडियाचे संस्थापक आणि सीएमडी प्रशांत वशिष्ठ म्हणाले की, “दर महिन्याला नॉन आरटीओ लीड-अॅसिड स्कूटर खरेदी करणारे 5 लाखांहून अधिक लोक मर्यादित रेंज आणि शॉर्ट वॉरंटीसारख्या अकार्यक्षमतेत अडकतात. आमच्या नवीन टू-व्हीलर मॉडेल्ससह आम्ही भारतीय रायडर्सना अधिक परवडणाऱ्या किंमतीत लांब वॉरंटी आणि चांगल्या श्रेणीसह सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह पर्याय प्रदान करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.”
पुढे वशिष्ठ म्हणाले की, “मला विश्वास आहे की, आमच्या मेड इन इंडिया सोकुडो इलेक्ट्रिक स्कूटरची अद्वितीय आणि सर्वसमावेशक वैशिष्ट्ये स्वत: बोलतात आणि बहुतेक आंतरराष्ट्रीय ब्रँडपेक्षा आम्हाला एक चांगले आणि अधिक विश्वासार्ह मोबिलिटी सोल्यूशन प्रदाता म्हणून उदयास येण्यास मदत करतील.”