Haldiram IPO : खवय्यांचा मूड बनवणाऱ्या आणि तोंडाची चव वाढवणाऱ्या हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी खमंग बातमी आणली आहे. येत्या काही दिवसांत 'हल्दीराम' ही कंपनी आयपीओ बाजारात आणण्याची शक्यता आहे. अर्थात, सध्या केवळ त्यावर विचार सुरू आहे.
हल्दीराममधील काही हिस्सा परदेशी गुंतवणूकदारांना विकण्याची योजना होती. मात्र, ही योजना रखडल्यानं कंपनीचे मालक अग्रवाल यांनी आयपीओचा विचार सुरू केला आहे, अशी माहिती ब्लूमबर्गनं दिली आहे.
अग्रवाल कुटुंबाला या कंपनीचं मूल्यांकन सुमारे १२ अब्ज डॉलर्स अपेक्षित होतं. मात्र, त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. केवळ ८ अब्ज ते ८.५ अब्ज डॉलर मूल्याची बोली लागली. हल्दीराम या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या कंपनीला मे महिन्यात ब्लॅकस्टोन इंकशी सलंग्न अबुधाबी इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटी आणि GIC Pte यांच्याकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. तसंच, बेन अँड कंपनी आणि टेमासेक होल्डिंग्ज पीटीई यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या.
गंगा बिशन अग्रवाल यांनी १९३० मध्ये हल्दीरामचा पाया घातला. राजस्थानमधील बिकानेरमध्ये अग्रवाल कुटुंबानं मिठाई आणि नमकीनच्या दुकानापासून सुरुवात केली. सध्या ही स्नॅक्स मार्केटमधील आघाडीची कंपनी आहे. पेप्सिकोच्या लेज आणि कुरकुरे, बालाजी स्नॅक्स, प्रताप स्नॅक्सचा यलो डायमंड, बिकानेरवाला, बिकाजी फूड्स आणि आयटीसी फूड्सचा बिंगो फ्रँचायझी यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सला तगडी टक्कर देत हल्दीराम बाजारात टिकून आहे.
हल्दीराम गोड आणि खारट स्नॅक्स, फ्रोझन फूड आणि ब्रेडसह विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पुरवतो. कंपनी दिल्ली आणि आसपास ४३ रेस्टॉरंट्स देखील चालवते. हल्दीरामचा पसारा जगभरात आहे. ही कंपनी यूके, अमेरिका आणि जपानसह १०० देशांमध्ये कार्यरत आहे. यापैकी काही देशांमध्ये कंपनी फ्रँचायझींच्या माध्यमातून व्यवसाय करते.
(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील विश्लेषकांची मतं त्यांची स्वत:ची आहेत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)