Smartphones Under 14000: विवोचा लोकप्रिय 5G फोन विवो वाय २८ एस आता आणखी स्वस्त झाला आहे. विवो इंडियाने या फोनच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात केली आहे, ज्यामुळे आता हा फोन आणखी स्वस्त झाला आहे. 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी हा फोन एक पर्याय ठरू शकतो. कपातीनंतर हा फोन १३ हजार ४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मिळत आहे. विवोचा हा फोन डायमेंसिटी ६३०० 5G प्रोसेसरसह येतो आणि यात ५० मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ५००० एमएएचची मोठी बॅटरी आहे.
विवो वाय २८ एस हा फोन तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला असून या तिन्ही व्हेरियंटमध्ये स्टँडर्ड १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने तिन्ही व्हेरियंटच्या किंमतीत ५०० रुपयांची कपात केली आहे. कपातीनंतर फोनच्या ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३ हजार ४९९ रुपये, ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४ हजार ९९९ रुपये आणि ८ जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६ हजार ४९९ रुपये झाली आहे.
हा फोन विंटेज रेड आणि ट्विंकलिंग पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल. फ्लिपकार्ट, विवो इंडिया ई-स्टोअर आणि सर्व रिटेल पार्टनर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. लॉन्चिंग वेळी फोनच्या ४ जीबी रॅम+१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये, ६+१२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १५ हजार ४९९ रुपये आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये होती.
हा फोन ड्युअल नॅनो-सिम सपोर्टसह येतो आणि ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ८४० निट्स पीक ब्राइटनेस लेव्हलसह ६.५६ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. डोळ्यांच्या संरक्षणासाठी हा डिस्प्ले टीयूव्ही रेनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो. यात एचडी प्लस रिझोल्यूशनचा सपोर्ट आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६१०० 5G प्रोसेसर असून ८ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित फनटच ओएस १४ वर काम करतो.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात सोनी आयएमएक्स ८५२ सेन्सरसह ५० मेगापिक्सलचा मेन रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यात सुपर नाईट मोड आणि मल्टी स्टाइल पोर्ट्रेट मोडचा सपोर्ट आहे. फोनमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि १५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 5G, ब्लूटूथ ५.४, जीपीएस आणि वाय-फाय सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध आहेत. सुरक्षिततेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हा फोन आयपी ६४ रेटिंगसह येतो.
संबंधित बातम्या