Central govt Decisions : अंतरिम अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना खूषखबर दिली आहे. मोबाइल फोनच्या स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्कात (Import Duty) सरकारनं कपात केली आहे. त्यामुळं पुढील काही दिवसांत स्मार्टफोन्स स्वस्त होणार आहेत.
केंद्र सरकारनं या संदर्भात एक अधिसूचना काढली आहे. त्यानुसार मोबाइलच्या स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क १५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी केलं जाणार आहे. यामुळं मोबाइल फोनचं उत्पादन स्वस्त होईल आणि फोनच्या किमती कमी होण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय, मोबाइल फोन उत्पादक कंपन्यांना भारतात फोन निर्मितीसाठी चालना मिळणार आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयानं मंगळवारी रात्री काढलेल्या अधिसूचनेत आयात शुल्कात कपात करण्यात आलेल्या स्पेअर पार्ट्सचा तपशीलही दिला आहे. त्यानुसार, बॅटरी कव्हर, मुख्य कॅमेरा लेन्स, बॅक कव्हर्स, प्लास्टिक आणि धातूच्या वस्तू, जीएसएम अँटेना आणि इतर अनेक भागांवरील आयात शुल्क कमी होणार आहे. वरील पार्ट्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर आणण्यात आलं आहे.
मोबाइलच्या आणखी काही पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करून १० टक्क्यांवर आणण्यात आलं आहे. यात कंडक्टिव्ह कापड, एलसीडी कंडक्टिव्ह फोम, एलसीडी फोम, बीटी फोम, बॅटरी हीट प्रोटेक्शन कव्हर, स्टिकर बॅटरी स्लॉट, मेन लेन्स प्रोटेक्टिव्ह फिल्म, एलसीडी एफपीसी, फिल्म फ्रंट फ्लॅश आणि साइड यांचा समावेश आहे.
भारताला स्मार्टफोन उत्पादनाचं केंद्र बनवण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष भर दिला आहे. अॅपल (Apple), शाओमी (Xiaomi), सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स (Samsung) आणि विवो (Vivo) सारख्या कंपन्यांना भारतात फोन असेम्बल करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आहे.
सरकारन मोबाइलच्या स्पेअर पार्ट्सवरील आयात शुल्क कमी केलं किंवा काही श्रेणींमध्ये आयात शुल्क काढून टाकलं तर भारतातून मोबाइल फोनची निर्यात पुढील दोन वर्षांत तिप्पट होऊन ३९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असं इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) नं याआधीच म्हटलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सुमारे ५० अब्ज डॉलर किमतीचे मोबाइल फोन बनवले जाण्याची अपेक्षा आहे.