Smartphones may get Expensive : पुढच्या काही दिवसांत नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर विचार लवकरात लवकर पक्का करा आणि फोन घेऊनच टाका. कारण, येत्या जून महिन्यापासून स्मार्टफोन महागण्याची शक्यता आहे.
मेमरीच्या किमतीत झालेली वाढ आणि चिनी चलन युआनच्या मजबूत स्थितीमुळं या वर्षी जूनपासून देशातील स्मार्टफोनच्या किंमती वाढू शकतात, असा अंदाज आहे. मार्केट रिसर्च फर्म ‘ट्रेंडफोर्स’च्या आकडेवारीचा हवाला देत 'इकॉनॉमिक टाइम्स'नं हे वृत्त दिलं आहे.
डीआरएएम (Memory Chip) किमतींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळं सॅमसंग आणि मायक्रॉन या दोन प्रमुख पुरवठादारांनी मार्च तिमाहीत किंमती १५ ते २० टक्क्यांनी वाढवण्याचा विचार सुरू केला आहे. एआयचा वेगानं होणारा वापर, स्मार्टफोन आणि पीसी मार्केटमधील तेजीमुळं पुरवठ्यात अडथळ्यांमुळे ही किंमत वाढली आहे.
फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून मार्चच्या पहिल्या आठवड्यांपर्यंत मागणी वाढल्यानं मेमरीच्या किमती तब्बल १० ते १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास सर्व स्मार्टफोनच्या किंमती वाढतील. मात्र, मोबाइलच्या स्पेअर पार्ट्सच्या आयात शुल्कात केंद्र सरकारनं नुकत्याच केलेल्या कपातीमुळं किंमतीतील ही वाढ सुसह्य राहील, असं सांगितलं जातं. अलीकडंच केंद्र सरकारनं बॅटरी कव्हर, मेन लेन्स, बॅक कव्हर, अँटेना, सिम सॉकेट आणि इतर यांत्रिक वस्तूंसह मोबाइल फोन निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या घटकांवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेमरी चीपच्या किंमती वाढल्याचा परिणाम कंपन्यांना पुढील तिमाहीपासून जाणवेल, कारण बहुतांश कंपन्यांकडं सध्या मार्च तिमाहीत उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक तो स्टॉक आहे.
मोबाईल कंपन्या केवळ स्मार्टफोनच्या किंमती वाढवूनच थांबणार नाहीत तर, स्मार्टफोनमध्ये कमी मेमरी आणि स्टोरेज देतील, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. मेमरी चिप्सच्या किमतीत वाढ झाल्यानं भारतात ५ जी तंत्रज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणास फटका बसू शकतो, अशीही भीती आहे.