रिलायन्सकडून दुसरी मोठी ऑर्डर मिळताच १५ रुपयांपेक्षाही स्वस्त शेअरमध्ये जबरदस्त तेजी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रिलायन्सकडून दुसरी मोठी ऑर्डर मिळताच १५ रुपयांपेक्षाही स्वस्त शेअरमध्ये जबरदस्त तेजी

रिलायन्सकडून दुसरी मोठी ऑर्डर मिळताच १५ रुपयांपेक्षाही स्वस्त शेअरमध्ये जबरदस्त तेजी

Published Oct 15, 2024 01:21 PM IST

Small Cap stock news : रिलायन्स इंडस्ट्रीजकडून अवघ्या काही दिवसांत दुसरी मोठी ऑर्डर मिळाल्यानंतर गुजरात टूलरूम या चिमुकल्या कंपनीचे शेअर तेजीत आहेत.

रिलायन्सकडून मोठी ऑर्डर मिळताच १५ रुपयांपेक्षाही स्वस्त शेअरमध्ये जबर तेजी
रिलायन्सकडून मोठी ऑर्डर मिळताच १५ रुपयांपेक्षाही स्वस्त शेअरमध्ये जबर तेजी (Pixabay)

Stock Market Updates : शेअर बाजार आणि अनिश्चितता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इथं कधी काय होईल सांगता येत नाही. गुजरात टूलरूम या चिमुकल्या शेअरला सध्या हाच अनुभव येत आहे. १५ रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या शेअरमध्ये आज ५ टक्के वाढ झाली असून या शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे.

प्लास्टिकच्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीचा शेअर कालच्या तुलनेत जवळपास ५ टक्क्यांनी वाढून १४.३८ रुपयांवर पोहोचला आहे. मंगळवारी हा शेअर १३.७० रुपयांवर बंद झाला होता. तो आज ४.९६ टक्क्यांनी वधारून १४.३८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. एका बातमीनं ही कमाल केली आहे.

एक्स्चेंज फायलिंगमध्ये कंपनीनं दिली माहिती

गुजरात टूलरूमनं १५ ऑक्टोबर रोजी एक्स्चेंज फाइलिंगला काही माहिती दिली आहे. त्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून बांधकाम साहित्याच्या पुरवठ्यासाठी ३१० दशलक्ष रुपयांची ऑर्डर आली आहे. येत्या दोन महिन्यांत ही ऑर्डर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

याआधी ५ मार्च २०२४ रोजी रिलान्सनं आम्हाला २९० दशलक्ष रुपयांची ऑर्डर दिली होती. ती आम्ही १४ ऑक्टोबर २०२४ रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली. या दोन ऑर्डर्समुळं रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आलेल्या एकूण ऑर्डरची किंमत ६० कोटी रुपये झाली आहे. नव्या ऑर्डरमुळं रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत सुरू असलेलं आमचं सहकार्य अधिक बळकट होईल, असा विश्वास कंपनीनं व्यक्त केला आहे.

'रिलायन्स इंडस्ट्रीजचा गुजरात टूलरूमवर असलेला विश्वास अधिक दृढ झाला असून, बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याचा विश्वासार्ह उत्पादक म्हणून आमचं स्थान बळकट झालं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर प्रमुख ग्राहकांकडून पुढील ऑर्डर मिळण्याबाबत आम्ही आशावादी आहोत. त्यामुळं कंपनीच्या भविष्यातील वाढीला आणि महसुलाच्या विस्ताराला चालना मिळेल, असंही कंपनीनं स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.

काय करते ही कंपनी?

कंपनीनं अलीकडंच क्युआयपीच्या (क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट) माध्यमातून ५०० दशलक्ष रुपये उभारले आहेत. त्यासाठी ११.५० रुपये प्रति शेअर दरानं ४३.४८ दशलक्ष इक्विटी शेअर्स जारी केले होते. स्वच्छ ऊर्जा, खाणकाम आणि आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स सारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून, आपल्या विस्तार योजनांना गती देण्यासाठी क्यूआयपीमधून उभारलेल्या भांडवलाचा वापर करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीनं गुजरातमध्ये संकरित ऊर्जा प्रकल्प विकसित केला असून सौर, पवन आणि इतर अक्षय ऊर्जा स्त्रोतांचं एकत्रीकरण करण्याची योजना आहे. याव्यतिरिक्त, कंपनीनं झाम्बियातील सोन्याच्या खाणी अधिग्रहित केल्या आहेत.

मौल्यवान धातूंची वाढती जागतिक मागणी कंपनीच्या खाण विभागासाठी एक आकर्षक संधी आहे. शिवाय, दुबईत उपकंपनी स्थापन करून कंपनीनं धोरणात्मक झेप घेतली आहे. त्यामुळं गुजरात टूलरूमला वेगानं वाढत असलेल्या मध्य पूर्व आणि आफ्रिकन बाजारपेठांमध्ये पाय रोवता आले आहेत. ही उपकंपनी खाण आणि बांधकाम क्षेत्रात कंपनीचं अस्तित्व अधोरेखित करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

गुजरात टूलरूमच्या शेअरची वाटचाल

या स्मॉल कॅप शेअरमध्ये चालू महिन्यात आतापर्यंत मोठी वाढ झाली असून, सप्टेंबरमध्ये १५ टक्क्यांच्या घसरणीनंतर २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी ११ मार्च रोजी कंपनीनं ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी (४५.९७ रुपये) गाठली, परंतु त्यानंतर मोठी नफावसुली झाली. या वर्षी १४ ऑगस्ट रोजी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर १०.७५ रुपयांवर पोहोचला होता. वर्षभरात या शेअरमध्ये ५९ टक्क्यांची घसरण झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner