Shriram Finance Dividend News : एनबीएफसी श्रीराम फायनान्स लिमिटेडनं दोन मोठे निर्णय घेत गुंतवणूकदारांना दिवाळीची भेट दिली आहे. कंपनीनं आपल्या शेअरचं विभाजन करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक शेअरमागे २२ रुपये डिविडंडही जाहीर केला आहे.
शुक्रवारी, २५ ऑक्टोबर रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीनं शेअर विभाजनाची घोषणा केली. त्यानुसार कंपनी १० रुपये अंकित मूल्याच्या शेअरची २ रुपये अंकित मूल्याच्या ५ शेअर्समध्ये विभागणी करणार आहे. यासाठी रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीनं विभाजनाचा निर्णय पहिल्यांदाच घेतला आहे.
श्रीराम फायनान्सने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १० रुपयांच्या अंकित मूल्याच्या समभागमागे २२ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. अंतरिम लाभांशासाठी रेकॉर्ड डेट ७ नोव्हेंबर २०२४ ही निश्चित करण्यात आली आहे. पात्र भागधारकांना २४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंतरिम लाभांश दिला जाईल.
श्रीराम फायनान्सनं दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. श्रीराम फायनान्सचा करोत्तर नफा १८.३ टक्क्यांनी वाढून २०७१.२६ कोटी रुपये झाला आहे. सप्टेंबर तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न (NII) १६.३७ टक्क्यांनी वाढून ५,६०६.७४ कोटी रुपये झालं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ४,८१८.१८ कोटी रुपये होता.
श्रीराम फायनान्स लिमिटेडचा शेअर शुक्रवारी ३.९२ टक्क्यांनी घसरून ३,११८ रुपयांवर बंद झाला. २०२४ मध्ये हा शेअर आतापर्यंत ५२ टक्क्यांनी वधारला आहे आणि गेल्या वर्षभरात ७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.
स्टॉक स्प्लिट म्हणजे शेअर विभाजनाचा निर्णय वेगवेगळ्या कारणांसाठी घेतला जातो. मात्र, प्रामुख्यानं शेअर सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावा हा यामागचा हेतू असतो. ज्या प्रमाणात शेअरचं विभाजन केलं जातं, त्या प्रमाणात त्याची किंमत खाली येते. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना तो परवडू शकतो. त्यामुळं गुंतवणूकदार कंपनीकडं आकर्षित होतात. या सगळ्याचा विचार करून कंपन्यांकडून शेअर स्प्लिट केला जातो. या स्प्लिटमुळं कंपनीच्या बाजारमूल्यावर किंवा गुंतवणूकदारांच्या खात्यातील शेअरच्या मूल्यावर काही परिणाम होत नाही. केवळ त्यांची संख्या वाढते.