Dividend News : तिमाही नफा ९६ टक्क्यांनी वाढताच श्रीराम फायनान्सची गुंतवणूकदारांना खूषखबर! डिविडंडची केली घोषणा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend News : तिमाही नफा ९६ टक्क्यांनी वाढताच श्रीराम फायनान्सची गुंतवणूकदारांना खूषखबर! डिविडंडची केली घोषणा

Dividend News : तिमाही नफा ९६ टक्क्यांनी वाढताच श्रीराम फायनान्सची गुंतवणूकदारांना खूषखबर! डिविडंडची केली घोषणा

Jan 24, 2025 03:59 PM IST

Shriram Finance Dividend News : श्रीराम फायनान्स कंपनीचा निव्वळ नफा डिसेंबर अखेरच्या तिमाहीत तब्बल ९६.३ टक्क्यांनी वाढला आहे. तिमाही निकालानंतर कंपनीनं लगेचच डिविडंडची घोषणा केली आहे.

श्रीराम फायनान्ससची चमकदार कामगिरी! तिमाही नफ्यात जवळपास दुप्पट वाढ; डिविडंडची घोषणा
श्रीराम फायनान्ससची चमकदार कामगिरी! तिमाही नफ्यात जवळपास दुप्पट वाढ; डिविडंडची घोषणा

Dividend News in Marathi : वित्तीय सेवा क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्सचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ९६.३ टक्क्यांनी वाढला आहे. या चमकदार कामगिरीनंतर कंपनीनं गुंतवणूकदारांना डिविडंड देण्याची घोषणा केली आहे.

डिसेंबर अखेरच्या तिमाहीत श्रीराम फायनान्सचा निव्वळ नफा ३,५६९.७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,८१८.३३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. तर, दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात ७२.३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

हाऊसिंग फायनान्स उपकंपनीतील हिस्सा विकल्यामुळं एकरकमी १,४८९ कोटी रुपयांच्या करोत्तर नफ्यात लक्षणीय वाढ झाली. पूर्वी श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या उपकंपनीचे आता ट्रूहोम फायनान्स लिमिटेड असं नामकरण करण्यात आलं आहे. 

तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर बीएसईवर श्रीराम फायनान्सच्या शेअरमध्ये आज घसरण झाली. एनएसईवर हा शेअर ५१७ रुपयांपर्यंत घसरला होता. दिवसअखेर ०.९७ टक्क्यांनी घसरून ५२४.६५ रुपयांवर बंद झाला.

निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ

श्रीराम फायनान्सचं निव्वळ व्याज उत्पन्न ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत १४.३१ टक्क्यांनी वाढून ५८२२.६९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. प्रति शेअर उत्पन्न (बेसिक) १६.६२ टक्क्यांनी वाढून ३२.६२ रुपयांवर पोहोचलं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत २७.९७ रुपये होतं. श्रीराम हाऊसिंग फायनान्समधील कंपनीचा हिस्सा विकण्याचा परिणामानंतर देखील ही वाढ नोंदविण्यात आली आहे, असं कंपनीनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये नमूद केलं आहे.

एक्सचेंज फाइलिंगनुसार, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्तेत १८.७८ टक्क्यांनी वाढ झाली असून ती २,५४,४६९.६९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबर रोजी नोंदवलेल्या २,१४,२३३.४७ कोटी रुपयांच्या तुलनेत आणि ३० सप्टेंबर २०२४ रोजी २,४३,०४२.५५ कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.

एका शेअरवर किती मिळणार डिविडंड?

संचालक मंडळानं १२५ टक्के म्हणजेच २.५० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशासाठी पात्र ठरण्यासाठी रेकॉर्ड डेट ३१ जानेवारी २०२५ ही निश्चित करण्यात आली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner