Dividend Stock : सिमेंट कंपनी श्री सिमेंट लिमिटेडनं गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी एका शेअरवर ५० रुपये लाभांश देणार आहे. त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर करण्यात आली आहे.
श्री सिमेंट ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक कंपनी आहे. या कंपनीनं आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना ३० पेक्षा जास्त वेळा लाभांश दिला आहे. आता पुन्हा एकदा कंपनीनं लाभांश जाहीर केला आहे. यंदाच्या वर्षी लाभांश देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
श्री सिमेंट लिमिटेडनं एक्सचेंजला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर ५० रुपये लाभांश देण्यात येणार आहे. कंपनीनं या लाभांशासाठी ५ फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांची नावं या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहतील, त्यांनाच लाभांशाचा लाभ मिळणार आहे.
मागील वर्षी, म्हणजेच २०२४ मध्ये कंपनीनं दोन वेळा लाभांश दिला. एकदा एका शेअरवर ५५ रुपये दिले होते. तर, दुसऱ्या वेळी ५० रुपयांचा लाभांश दिला होता.
श्री सिमेंट लिमिटेडचा शेअर शनिवारी १.७४ टक्क्यांनी घसरून २७,३४५.१५ रुपयांवर आला. गेल्या वर्षभरात शेअर बाजारात कंपनीची कामगिरी चांगली राहिलेली नाही. या कालावधीत हा शेअर ७.६७ टक्क्यांनी घसरला आहे. या कालावधीत सेन्सेक्समध्ये ८.१८ टक्क्यांची वाढ दिसून आली होती.
कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २९६२८.१० रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २३५००.१५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप ९८६६३ कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या