मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Shark Tank India: आर्थिक गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या 'शार्क' एक्स्पर्टसचा सल्ला

Shark Tank India: आर्थिक गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या 'शार्क' एक्स्पर्टसचा सल्ला

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 21, 2024 07:02 PM IST

दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी गुंतवणूक करण्यासाठीचे योग्य मार्ग कोणते, एसआयपीमध्ये गुंतवणुकीचे फायदे, तोटे काय, याविषयी सांगताएत एडलवाइज म्युच्युअल फंडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राधिका गुप्ता

Shark Tank: Edelweiss mutual CEO Radhika Gupta gives this investment tips
Shark Tank: Edelweiss mutual CEO Radhika Gupta gives this investment tips

लोकप्रिय टीव्ही शो शार्क टँक (Shark Tank) सध्या जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. या शोच्या माध्यमातून उद्योजकांना त्यांच्या नवनवीन व्यावसायिक कल्पना मांडण्यासाठी केवळ व्यासपीठ उपलब्ध होत नसून यशस्वी उद्योजकांकडून गुंतवणूक मिळवण्याची संधी प्राप्त होत असते. शिवाय देशभर प्रसिद्धी मिळते. त्यामुळे हा शो नवउद्योजकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. हा शो उद्योग विश्वातील घडामोडींची माहिती प्रदान करत असतो. या शोच्या माध्यमातून आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक धोरणांचे महत्त्व देखील अधोरेखित केले जात असते.

शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन आता सुरू झाला आहे. यावेळीच्या भागात (Shark Tank India) एडलवाइज म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता या नवीन शार्क  म्हणून दाखल झाल्या आहेत. गुप्ता यांनी गुंतवणुकीच्या काही अभ्यासपूर्ण टिप्स शेअर केल्या आहेत. गुंतवणूकदारांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या या टीप्स आहेत.

आपल्या उत्पन्नाच्या काही भागाची बचत करून तो शहाणपणाने गुंतवण्याचा सल्ला गुप्ता देतात. आपल्या कमाईतून खर्च आणि कर वजा जाता उरलेल्या रकमेच्या किमान २०% किंवा ३०% किंवा ५०% रक्कम बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा सल्ला गुप्ता देतात. गुंतवणुकीची सवय लावण्यासाठी मासिक गुंतवणूक योजना (Systematic Investment Plan - SIP) खरेदी करू शकता. दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत आणि गुंतवणूक आवश्यक आहे, असल्याचे गुप्ता सांगतात.

बचत आणि मासिक गुंतवणूक योजनांचे महत्त्व

आणीबाणीच्या परिस्थितीत आर्थिक सुरक्षा : बचत केल्याने व्यक्तींना कर्जाचा आधार न घेता किंवा मालमत्ता तारण न ठेवता अनपेक्षित आलेला खर्च आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळता येते. बचतीमुळे कठीण काळात मदत मिळते. यामुळे व्यक्तीला त्याचे आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होते.

आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे : घराच्या डाऊन पेमेंटसाठी बचत असो, उच्च शिक्षणासाठी निधी जमा करणे असो किंवा निवृत्तीनंतरचे नियोजन असो, प्रत्येकाचे आर्थिक ध्येय असणे महत्त्वाचे असते. म्युच्युअल फंड एसआयपी बचतीसाठी गुंतवणूकदाराला एक नेटका दृष्टीकोन प्रदान करतात. परिणामी कोणतीही व्यक्ती त्याच्या आर्थिक बचतीच्या ध्येयाकडे पद्धतशीरपणे वाटचाल करत असते. नियमित बचतीमुळे गुंतवणुकीत सातत्याने वाढ होते आणि कालांतराने उत्तम परतावा मिळतो.

विविध ठिकाणी गुंतवणूक आणि नीट व्यवस्थापन: शेअर्स, रोखे आणि इतर मालमत्तेच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड कंपन्या या गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करत असतात. म्युच्युअल फंडचे व्यवस्थापक हे तज्ञ मंडळी असतात. गुंतवणुकीच्या जोखीमेचे ते व्यवस्थापन करताना जास्तीत जास्त परतावा कसा मिळू शकेल हा मुख्य उद्येश ठेवला जातो.

लवचिकता आणि सुविधा: मासिक एसआयपी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार कमी रकमेपासून सुरुवात करू शकतात आणि कालांतराने ती हळूहळू वाढवू शकता. एसआयपी सहजपणे ऑनलाइन पद्धतीने व्यवस्थापित केले जाऊ शकतात. ही गुंतवणूक प्रक्रिया सोयीस्कर आणि त्रासमुक्त असते.

दीर्घकालीन गुंतवणूक : मासिक एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास दीर्घ काळासाठी मोठा निधी मिळण्याची शक्यता निर्माण होते.

कर लाभ : इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) सारख्या काही म्युच्युअल फंड योजना आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर लाभ देतात. मासिक एसआयपीद्वारे या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक परतावा प्राप्त करताना कर बचतीचामध्येही मदत होते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या