विनीता सिंह, एक भारतीय उद्योजक आणि भारतातील आघाडीच्या सौंदर्य प्रसाधन ब्रँडपैकी एक असलेल्या SUGAR कॉस्मेटिक्सच्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. त्याचबरोबर त्या टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो ‘शार्क टँक इंडिया’च्या परीक्षकही आहेत.
शुगर कॉस्मेटिक्सच्या सीईओ विनीता सिंह यांनी ८ वर्षापूर्वी पती कौशिक मुखर्जी यांच्यासोबत एका कंपनीची सुरूवात केली आहे. आज विनीता सिंह यांची शुगर कॉस्मेटिक्स ५००० कोटी रुपये भांडवलाची कंपनी बनली आहे.
एका मुलाखातीत बोलताना विनीता यांनी कंपनीची सुरूवात करताना तसेच भांडवल उभारताना कोणत्या आव्हानांना सामना करावा लागला, याची माहिती दिली. त्याचबरोबर कंपनीसाठी भांडवल उभारताना तरुण स्टार्टअप संस्थापक किंवा उद्योजकाने कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दलही मार्गदर्शन केले. विनीता सिंह म्हणाल्या की, शुगर (SUGAR) कॉस्मेटिक्ससाठी निधी उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. कंपनी उभी करताना भांडवल कसे उभे करावे हे आमच्यासमोर एक आव्हान होते. जवळपास १०० हून अधिक उद्योग भांडवलदारांकडून (venture capitalists ) नकाराचा सामना करावा लागला. त्यांनी पुढे सांगितले की ती सर्व नकार पत्रे मी जतन करून ठेवली आहेत. कारण ते नेहमी प्रेरणा देत असतात.
विनिता म्हणाल्या की, आमच्यासाठी सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. आमच्याकडे कदाचित १०० हून अधिक व्हेंचर कॅपिटलिस्ट होते ज्यांनी आम्हाला भांडवल पुरवठा करण्यास नकार दिला होता. ती सर्व नकार पत्रे मी जतन करून ठेवली आहेत, कारण जेव्हा कोणी तुम्हाला नकार देते, तेव्हा ते चुकीचे सिद्ध करण्यासाठी ज्या प्रेरणेची गरज असते, ती या पत्रातून मिळते. मात्र त्यांनी निधी दिला नाही, यासाठी आम्ही त्यांना दोष देणार नाही कारण २०१५ मध्ये बाजारपेठ खूप वेगळी होती.
आम्हाला अंदाज नव्हता की, २०२० मध्ये मेड इन इंडियाचा बोलबाला होईल. तसेच संपूर्ण ब्रँड डिजिटल ब्रँड्स इकोसिस्टम विकसित केली गेली नव्हती. अशा ब्रॅड्सना भांडवल पुरवठा करण्यास नकार येत होता. ही गुंतवणूक करण्यायोग्य श्रेणी आहे, असे उद्योग भांडवलदारांना वाटत नव्हते. डिजिटल ब्रँड सुरुवातीला दोन ते तीन पट वाढतात आणि नंतर सुमारे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढतात. तसेच ते अधिक सुरक्षित आहेत.
जर एखाद्या स्टार्टअप फाउंडरपासून काही शिकायचे असेल तर हे समजावे लागेल की, तुम्हाला जी गोष्ट आवडते त्याच क्षेत्रात व्यवसाय उभा केला पाहिजे.