Stock Market Updates : मल्टीबॅगर शेअर एसजेव्हीएन लिमिटेडचा शेअर आज भलताच तेजीत आहे. बुधवारी सकाळच्या सत्रात या शेअरमध्ये ६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीनं १००० मेगावॅटच्या हाथीदाह दुर्गावती पीएसपीसाठी बिहार सरकारसोबत केलेला सामंजस्य करार या तेजीला कारण ठरला आहे.
वर्षाच्या शेवटच्या दिवशी, ३१ डिसेंबर २०२४ रोजी बाजार बंद झाल्यानंतर या कराराची बातमी आली. त्याचा परिणाम आज लगेचच दिसला आहे. एनएसईवर बुधवारी एसजेव्हीएनचा शेअर १०७.२८ रुपयांवर खुला झाला. काल हा शेअर १०४.४० रुपयांवर बंद झाला. मागील बंद किंमतीपेक्षा सुमारे २.७ टक्क्यांनी वधारून आज शेअर खुला झाला. त्यानंतर एसजेव्हीएनच्या शेअरचा भाव इंट्राडे उच्चांकी पातळीवर १११.५० रुपयांवर पोहोचला. म्हणजेच एकूण ६ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदविण्यात आली.
गेल्या वर्षभरात कंपनीनं सुमारे २० टक्के परतावा दिला असून मागच्या पाच वर्षात शेअरमध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. एसजेव्हीएनच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६१.४५ रुपये आणि नीचांकी स्तर ८८.८५ रुपये आहे. बाजारात झालेल्या प्रचंड घसरणीमुळं एसजेव्हीएनच्या शेअरच्या किमतीत घसरण झाली आहे. मात्र ही घसरण कालांतरानं भरून निघाली आहे.
एसजेव्हीएनचा आरओआय (ROI) दर २०२४ मध्ये ६.५३ टक्के, २०२३ मध्ये १० टक्के, २०२२ मध्ये ७.६३ टक्के, २०२१ मध्ये १५.१३ टक्के आणि २०२० मध्ये १३.४५ टक्के होता.
एसजेव्हीएनच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये ८१.८५ टक्के प्रवर्तक आहेत. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा कंपनीत २.६५ टक्के हिस्सा आहे. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची हिस्सेदारी ४.२९ टक्के आणि इतरांची १०.७४ टक्के आहे. कॉर्पोरेट होल्डिंग ०.४७ टक्के आहे.
एसजेव्हीएननं बिहारमधील १००० मेगावॅटचा हाथीदाह दुर्गावती पंप स्टोरेज प्रकल्प आणि इतर पीएसपीच्या विकासासाठी पाटणा इथं बिहार सरकारबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
बिहारच्या कैमूर जिल्ह्यातील दुर्गावती नदीवर हाथीदाह दुर्गावती पीएसपी हा १००० मेगावॅट (४ बाय २५० मेगावॅट) क्षमतेचा आहे. या प्रकल्पातून दररोज ६.३२५ दशलक्ष युनिट (एमयू) ऊर्जा आणि २३०८.६५ एमयू वार्षिक ऊर्जा निर्मितीची योजना आहे.
संबंधित बातम्या