Share Market : जीएसटीच्या भीतीनं कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांचे शेअर थंडावले! मोठी घसरण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market : जीएसटीच्या भीतीनं कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांचे शेअर थंडावले! मोठी घसरण

Share Market : जीएसटीच्या भीतीनं कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांचे शेअर थंडावले! मोठी घसरण

Dec 03, 2024 10:55 AM IST

GST news impact on share market : जीएसटी वाढण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावानंतर कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

कोल्ड ड्रिंक्स आणि सिगारेटवरील जीएसटी वाढवण्याच्या प्रस्तावावर या कंपन्यांचे समभाग घसरले
कोल्ड ड्रिंक्स आणि सिगारेटवरील जीएसटी वाढवण्याच्या प्रस्तावावर या कंपन्यांचे समभाग घसरले

Share Market updates : कोल्ड ड्रिंक्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. यात पेप्सिको लिमिटेडच्या सर्वात मोठ्या बॉटलिंग भागीदारांपैकी एक असलेल्या वरुण बेव्हरेजेस लिमिटेड व आयटीसीचे शेअर गडगडले आहेत. गॉडफ्रे फिलिप्स इंडियाही घसरून व्यवहार करत आहे.

जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कोल्ड ड्रिंकवरील जीएसटी दर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बातमीमुळं या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ तसेच वातानुकूलित पेयांवर ३५ टक्के विशेष जीएसटी दर प्रस्तावित करण्याचा निर्णय मंत्रिगटानं घेतला आहे. ३५ टक्के हा पूर्णपणे वेगळा स्लॅब असेल. सध्या ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के अशी रचना आहे.

जैसलमेर येथे होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या आगामी ५५ व्या बैठकीत मंत्रिगटाच्या अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे. इथं चर्चा करून प्रस्ताव स्वीकारायचे की नाकारायचे याचा निर्णय घेईल.

वरुण बेव्हरेजेस

वरुण बेव्हरेजेसचा सर्वाधिक महसूल कोल्ड ड्रिंक्समधून मिळतो. सकाळी १०.४५ मिनिटांनी वरुण बेव्हरेजेसचा शेअर १.२३ टक्क्यांनी घसरून ६२४.५० रुपयांवर व्यवहार करत होता. या शेअरमध्ये एका महिन्यात ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, यंदाच्या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ब्रोकरेज फर्म एमके आणि अ‍ॅक्सिस सिक्युरिटीजचे शेअरवर 'बाय' रेटिंग असून, अनुक्रमे ७५० रुपये प्रति शेअर आणि ७०० रुपये प्रति शेअर किंमतीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.

व्हीएसटी इंडस्ट्रीज

व्हीएसटी इंडस्ट्रीजचा शेअर सकाळी १०.४५ मिनिटांच्या सुमारास किरकोळ घसरणीसह ३२३.७० रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या महिनाभरात त्यात ५ टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सुमारे ६ टक्के परतावा दिला आहे.

गॉडफ्रे फिलिप्स

हा शेअर पावणे अकराच्या सुमारास १.१८ टक्क्यांनी घसरून ५६८९.२० च्या पातळीवर व्यवहार करत होता. गेल्या महिनाभरात त्यात सुमारे १७ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे. मात्र, या वर्षी आतापर्यंत १७१ टक्क्यांहून अधिक परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे.

आयटीसी

आयटीसीचे शेअर्स १.६६ टक्क्यांनी घसरून ४६९.३० रुपयांवर ट्रेड करत आहेत. एका महिन्यात या शेअरनं ३.१७ टक्के निगेटिव्ह परतावा दिला आहे. मात्र, यंदा त्यात केवळ ०.२९ टक्के वाढ झाली आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner