share market impact : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारीही चौफेर विक्री सुरूच राहिली आणि सलग सहाव्या दिवशी बाजारात घसरण नोंदविण्यात आली. सेन्सेक्स ६३८ अंकांनी घसरला व निफ्टीतही २१९ अंकांची घसरण झाली. या मोठ्या घसरणीमुळं दोन्ही निर्देशांक दीड महिन्याच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. यंदा पहिल्यांदाच सलग ६ दिवस बाजारात घसरण पाहायला मिळाली. २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान सेन्सेक्समध्ये ४००० अंकांची घसरण झाली आहे. निफ्टीतही १३०० अंकांची घसरण झाली आहे. या सगळ्याचा थेट परिणाम प्रत्यक्ष गुंतवणूकदारांबरोबरच सर्वसामान्यांवरही होणार आहे.
सर्वसामान्यांवर कसा आणि किती होणार परिणाम?
ईपीएफओ (EPFO) आपल्या वार्षिक निधीच्या १५ टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवते. पीएफचा व्याजदरही यावर अवलंबून असतो. शेअर बाजारात मोठी घसरण झाली की संस्थेचा निधीही कमी होतो. याचा परिणाम व्याजदरांवर होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) शेअर बाजारातून मिळणाऱ्या परताव्याशीही निगडित आहे. त्यातील ५० ते ७० टक्के गुंतवणूक बाजारात केली जाते. त्यामुळं शेअर बाजार पडल्यास नफ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. एनपीएस सरासरी १० ते १२ टक्के परतावा देते.
एनपीएस सदस्यांना निवृत्तीनंतर पेन्शन वार्षिकी योजना (Annuity Plan) घेणं आवश्यक आहे. कंपन्या शेअर बाजारात गुंतवणूक करतात. बाजारातील घसरणीमुळं अॅन्युइटी फंड कमी होईल, त्यामुळं पेन्शनची रक्कमही कमी होऊ शकते.
जवळपास सर्वच ब्रोकर गुंतवणूकदारांना क्रेडिट सुविधा देतात. त्यास लिव्हरेज म्हणतात. गुंतवणूकदार त्यांच्या मूळ रकमेच्या दुप्पट किंवा तिप्पट कर्ज घेऊन शेअर्स खरेदी करू शकतात. जेव्हा बाजारात मोठी घसरण होते, तेव्हा गुंतवणूकदाराला त्याची भरपाई करावी लागते.
सुमारे साडेसात हजार कंपन्या शेअर बाजाराशी निगडित आहेत. या कंपन्या बाजारातून निधी गोळा करतात. बाजारात घसरण झाली की या कंपन्यांचं बाजार भांडवल कमी होतं. ही घट भरून काढण्यात वेळ जातो. त्याचा थेट व्यवसायावर परिणाम होतो.
कंपन्या व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी खर्चात कपात करतात. यामुळं तरुणांना रोजगाराच्या संधीही कमी होतात. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतन-भत्त्यांमध्ये वाढ होण्याच्या अपेक्षेलाही धक्का बसतो.
शेअर बाजारातील घसरणीमुळंही रुपयाचं मूल्य घसरतं. देशात तयार होणाऱ्या अनेक जीवनावश्यक वस्तूंचा कच्चा माल आणि भाग परदेशातून येतात. त्यांच्या किमती वाढल्यानं इथं उत्पादित होणारी औषधं, खतं इत्यादी वस्तूंच्या किमती वाढतात.
अलीकडं परदेशी गुंतवणूकदार चीनकडे आकर्षित होत आहेत. बाजारातील घसरणीचं हेही एक मोठं कारण मानलं जात आहे. परदेशी गुंतवणूकदारांचा हा कल कायम राहिल्यास अर्थव्यवस्थेचा वेग काही काळ मंदावण्याची शक्यता आहे.
बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांकडून सरकारला व्यवहार कर (Transaction Tax), भांडवली नफा कर (Capital Gain Tax) आदी स्वरूपात महसूल मिळतो. या घसरणीमुळं गुंतवणूकदारांचा सहभाग कमी होईल. त्यामुळं सरकारचं उत्पन्न कमी होणार आहे.
१. पश्चिम आशियातील वाढता तणाव
२. चीनच्या प्रोत्साहन पॅकेजचा परिणाम
३. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा काढता पाय
४. रिझर्व्ह बँकेच्या धोरणात व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता
5. कॉर्पोरेट निकालांबद्दल अस्वस्थता
६. हरयाणा आणि जम्मू-काश्मीरमधील निवडणूक निकालाचा अंदाज
७. कच्च्या तेलाच्या वाढीमुळे अर्थव्यवस्थेसमोर आव्हान
सेन्सेक्समध्ये सूचीबद्ध कंपन्यांचा बाजारहिस्सा सोमवारी सुमारे ४६१ लाख कोटी रुपयांवरून ४५२ लाख कोटी रुपयांवर आला. म्हणजेच गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटींचं नुकसान झालं. गेल्या सहा सत्रात गुंतवणूकदारांचं सुमारे २५ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. यापूर्वी गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या विक्रीत गुंतवणूकदारांचं १७ लाख कोटींचं नुकसान झालं होतं.
शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत ३०,७१९ कोटी रुपयांची जोरदार विक्री केली आहे. सोमवारी त्यांनी आठ हजार कोटींहून अधिक रकमेचे शेअर्स विकले. त्याचवेळी गुरुवारी त्यांनी १५ हजार कोटी रुपये आणि शुक्रवारी ९८९६.९५ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली.
भारतीय परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून चिनी बाजारात गुंतवत आहेत. याचं कारण चीन सरकारनं उद्योग आणि वित्तीय बाजारांना नुकतंच दिलेलं प्रोत्साहन पॅकेज आहे. गेल्या आठवड्यात शांघाय शेअर बाजाराचा निर्देशांक २१ टक्क्यांनी वधारला आहे, तर हँगसेंग १५ टक्क्यांनी वधारला आहे.
संबंधित बातम्या