
सध्या गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) करणं टाळावं, असा सल्ला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड हाऊसचे मुख्य गुंतवणूक अधिकारी शंकरन नरेन यांनी दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं गुंतवणूक विश्वात खळबळ उडाली आहे.
सध्या स्मॉल आणि मिड कॅप फंडांचं मूल्यांकन जास्त असल्यानं अशा फंडांमधील गुंतवणूक काढण्याचा विचार केला पाहिजे. गुंतवणूकदारांनी महागड्या फंडांमध्ये एसआयपी केल्यास ही रणनीती त्यांच्यासाठी घातक ठरू शकते, विशेषत: जर गुंतवणूक दीर्घकाळ केली गेली नाही तर बहुतेक गुंतवणूकदारांना पुढचा काळ कठीण जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शंकरन यांचं हे भाषण नंतर मागे विविध प्लॅटफॉर्म्सवरून काढून टाकण्यात आलं. मात्र, ते नेमकं काय आणि का म्हणाले? जाणून घेऊया सविस्तर…
स्मॉल कॅप फंड हे छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. या कंपन्यांचं मार्केट कॅप खूपच कमी असतं. या फंडांमध्ये दीर्घकाळात चांगला परतावा देण्याची क्षमता असली, तरी त्यात जोखीमही जास्त असते. त्यानंतर शंकर यांचे भाषण काढून टाकण्यात आलं आहे.
पुढील रणनीती आखण्याआधी शंकरन यांचं संपूर्ण विधान आणि संदर्भ समजून घेणं आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी चुकीच्या उत्पादनात चुकीच्या वेळी एसआयपी केल्यास त्यांचं नुकसान होऊ शकतं, असं ते म्हणाले होते. स्मॉल कॅप आणि मिड कॅप योजनांमधील गुंतवणुकीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘गुंतवणूकदारांनी महागड्या (ओव्हरव्हॅल्यूड) फंडांमध्ये एसआयपी केल्यास ही गुंतवणूक रणनीती त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. वास्तविक, शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण असून पाच महिन्यांत बाजारात सुमारे १२ टक्के करेक्शन दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर शंकरन लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप आणि इक्विटी हायब्रीड उत्पादनांमध्ये एसआयपीची शिफारस करतात. स्मॉल कॅप आणि मिडकॅप योजनांमधील एसआयपी २० वर्षे सुरू ठेवल्याशिवाय फायदेशीर ठरू शकत नाही, परंतु एवढ्या दीर्घ काळ फंडात गुंतवणूक केल्याची उदाहरणं क्वचितच आढळतात’, याकडं त्यांनी लक्ष वेधलं.
एसआयपी नेहमीच फायदेशीर ठरत नाही. एसआयपी गुंतवणूकदारांसाठी तोट्याची ठरल्याची ऐतिहासिक उदाहरणं शंकरन यांनी दिली. १९९४-२००२ ते २००६-२०१३ या काळात मिडकॅपमधील एसआयपीमुळं गुंतवणूकदारांचं नुकसान झालं होतं. बाजाराचा सध्याचा कल पाहून लोक अनेकदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात, परंतु असं केल्यानं तोटा होऊ शकतो. जेव्हा बाजारात स्मॉल कॅप शेअर्सची किंमत वाढते तेव्हा त्यात गुंतवणूक करण्यापेक्षा इतर प्रकारच्या फंडांची निवड करणं चांगलं. म्युच्युअल फंड उद्योगातील मजबूत लॉबी, वितरक आणि पर्सनल फायनान्स तज्ज्ञ अनेकदा गुंतवणूकदारांना या जोखमींची माहिती देत नाहीत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं. अनेक तज्ज्ञांनी भीतीपोटी या विषयावर मौन बाळगलं आहे.
२०१३-१४ मध्ये स्मॉल आणि मिड कॅप शेअर्सचे मूल्यांकन अतिशय स्वस्त होतं आणि त्यात गुंतवणूक करणाऱ्या फंडांनी चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं गुंतवणुकीचं आकर्षण वाढलं असलं तरी आता त्यांचं मूल्यांकन खूप जास्त झालं आहे. अशा परिस्थितीत भविष्यात शॉर्ट किंवा मिड टर्ममध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं तर १० वर्षांपूर्वी स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्स स्वस्त होते, त्यामुळं त्यात गुंतवणूक करणाऱ्या फंडांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत होता. बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, २०२३ पासून या श्रेणीतील शेअर्स महाग झाले आहेत. त्यामुळं या श्रेणीत गुंतवणूक करणाऱ्यांचा गुंतवणुकीचा सरासरी खर्च आता अधिक होऊन त्यांना तोटा सहन करावा लागू शकतो. १५ ते २० वर्षे गुंतवणुकीचं क्षितिज असलेल्यांनी काळजी करण्याची गरज नाही, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्याच्या काळातील अनेक फंड मॅनेजर्सनी मंदीचा काळ (Bearsih Phase) पाहिलेला नाही कारण दशकभरापासून बाजारात चांगला काळ आहे आणि परतावा चांगला आहे. आता एसआयपी अंडरव्हॅल्यूड अॅसेट क्लासमध्ये करावी, जिथं आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता जास्त असते. गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांनी कमावलेल्या पैशांचं रक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळं फंडात वैविध्य आणण्यासाठी इक्विटीसह सोने-चांदी, रिअल इस्टेट आणि डेट फंड अशा अन्य पर्यायांमध्ये गुंतवणूक करावी. एसआयपी लार्ज कॅप आणि फ्लेक्सी कॅप फंडांसारख्या स्वस्त मालमत्ता वर्गाकडं वळली पाहिजे. 'बँकिंग, टेलिकॉम, ऑईल अँड गॅस आणि इन्शुरन्स या क्षेत्रांमध्ये सध्या चांगल्या शक्यता दिसत आहेत. ऑटो आणि रिअल इस्टेट सारखी क्षेत्रे दीर्घ मुदतीसाठी चांगली दिसतात, परंतु त्यांचं सध्याचं मूल्यांकन उच्च पातळीवर आहे, म्हणून गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, असं शंकरन म्हणाले.
संबंधित बातम्या
