Gold Silver vs Stock Market : सोने-चांदी आणि शेअर बाजार हे भारतीय गुंतवणूकदारांचे पसंतीचे पर्याय आहेत. करोना काळानंतर शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ कमालीचा वाढला आहे. शेअर बाजार वधारला की सोन्या-चांदीच्या भावात घसरण होते, असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. मात्र, २०२४ हे वर्ष त्यास अपवाद ठरताना दिसत आहे. या वर्षी परताव्याच्या बाबतीत सोन्या-चांदीनं सेन्सेक्स-निफ्टीलाही मागे टाकलं आहे.
मागील काही वर्षांतील परताव्याचा आढावा घेतल्यास आपल्याला नेमकी परिस्थिती लक्षात येऊ शकते. यंदाच्या वर्षीचे आतापर्यंतचे आकडे पाहिल्यास, सोन्यानं गुंतवणूकदारांना १३ टक्के परतावा दिला आहे, तर चांदीनं आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे ८ टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांकांपैकी NSE निफ्टी ४.६५ टक्क्यांनी वधारला आहे. तर, BSE सेन्सेक्स ३.८३ टक्क्यांनी वधारला आहे, तर बँक निफ्टी निर्देशांक या वर्षी सुमारे १.५६ टक्क्यांनी वधारला आहे.
२०२४ मध्ये शेअर बाजार आणि सराफा बाजार दोन्हींनी नवा उच्चांक गाठूनही जानेवारीपासून आतापर्यंत सोन्या-चांदीनं शेअर बाजाराला मागं टाकलं आहे.
अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरांत कपात होण्याची शक्यता, जगभरातील मध्यवर्ती बँकांनी सोन्याची सुरू ठेवलेली खरेदी या दोन कारणांमुळं सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यातच मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणावाच्या परिस्थितीमुळं जगभरात अनिश्चितता वाढली आहे. त्याचं प्रतिबिंबही सराफा बाजारातील तेजीत पडलं आहे.
जानेवारीपासून सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या वाढीबद्दल एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा म्हणाल्या, 'जागतिक अनिश्चिततेच्या परिस्थितीत सोनं ही अत्यंत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. त्याचबरोबर, उद्योगांमधील वाढती मागणी, हरित ऊर्जा उपक्रम आणि बाजारातील परिस्थितीमुळं चांदीलाही चालना मिळत आहे.
'पेस ३६०' चे सह-संस्थापक आणि चीफ ग्लोबल स्ट्रॅटेजिस्ट अमित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय शेअर बाजार ऑक्टोबर २०२३ च्या अखेरीपासून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. हीच परिस्थिती २०२४ मध्ये कायम आहे. मात्र ही वाढ निफ्टी आणि सेन्सेक्सची नाही. निफ्टी नेक्स्ट ५० मधील कंपन्यांनी जागतिक गुंतवणूक आकर्षित केली आहे. निफ्टी नेक्स्ट ५० नं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यात १९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. सोन्या-चांदीच्या तुलनेत निफ्टी नेक्स्ट ५० ची कामगिरी उत्तम आहे.
'मार्च ते डिसेंबर २०२३ दरम्यान सोने आणि चांदीमधील गुंतवणुकीला फारसा प्रतिसाद नव्हता. ईटीएफ गोल्ड होल्डिंग्स अलीकडंच ४ वर्षांच्या नीचांकी स्तरावर पोहोचल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडं, गेल्या ४ वर्षांतील तेजीमुळं शेअर बाजारात गुंतवणूक वाढली होती. ते चित्र आता बदलत आहे. या सगळ्या घटकांचा परिणाम सोन्या-चांदीच्या भाववाढीवर झाला असून त्यांनी निफ्टी आणि सेन्सेक्सपेक्षा चांगली कामगिरी केली आहे, असं अमित गोयल म्हणाले.
संबंधित बातम्या