Luxury Apartment: मुंबईसारख्या मोठ्या शहरात आलिशान घर खरेदी आकाशातील तारे तोडून आणण्याइतके कठीण आहे. मात्र, एका महिलेने मुंबईतील पॉश भागात एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे. सिमा सिंह असे त्या महिलेचे नाव आहे. या महिलेने कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबईतील वरळी येथे अलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान, सीमा सिंह कोण आहेत? त्या काय काम करतात? हे जाणून घ्यायची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
सीमा सिंह यांनी मुंबईतील वरळी भागात लोढा सी-फेस प्रकल्पाच्या ए-विंगच्या ३०व्या मजल्यावर एक आलिशान पेंटहाऊस खरेदी केले आहे. या पेंटहाऊसची एकूण किंमत १८५ कोटी रुपये इतकी आहे. हे पेंटहाऊस १४ हजार ८६६ चौरस फूट आहे. या अलिशान पेंटहाऊससह सीमा यांनी ९ पार्किंगच्या जागाही खरेदी केल्या आहेत, ज्यासाठी त्यांनी ९.२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. या पार्किंगच्या जागेची किंमत प्रति चौरस फूट १ लाख २४ हजार ४४६ रुपये आहे.
सीमा सिंह या अल्केम लॅबोरेटरीज नावाच्या कंपनीत प्रमोटर म्हणून कार्यरत आहेत. ही कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे आणि तिचे मार्केट कॅप ६४ हजार २७८ कोटी रुपये आहे. सीमा सिंह यांची सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीपर्यंत कंपनीत २.१६ टक्के भागिदारी आहे. याआधी जून महिन्यात सीमा सिंह यांनी अल्केम लॅबोरेटरीजमधील ०.३ टक्के भाग विकून १७७ कोटी रुपये उभे केले होते. त्यांनी ३.५८ लाख शेअर्स ४ हजार ९५६ रुपये प्रति शेअर या दराने विकले होते. मार्च २०२४ पर्यंत त्यांच्याकडे कंपनीत २.४६ टक्के भागिदारी होती. त्यांनी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने १.९२ लाख शेअर्स (०.१५ टक्के) खरेदी केले होते, यात मॉर्गन स्टॅनले एशिया सिंगापूर याचाही समावेश होता.
सीमा सिंह यांनी खरेदी केलेले पेंटहाऊस लोढा समूह यांच्या प्रकल्पाचा भाग आहे. लोढा समूह हा भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट डेव्हलपर्स पैकी एक आहे. लोढा समूह मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन, पुणे आणि बेंगळुरूसारख्या शहरांमध्ये महागड्या प्रकल्पांसाठी ओळखला जातो. कंपनीने आतापर्यंत १०० दशलक्ष चौरस फुटांपेक्षा जास्त रिअल इस्टेट तयार केली आहे. सध्या कंपनी ११० दशलक्ष चौरस फूट किंमतीच्या नवीन प्रकल्पांवर काम करत आहे.
संबंधित बातम्या