Asmita Patel : स्टॉक मार्केट इन्फ्लुएन्सर अस्मिता पटेल हिला सेबीचा मोठा दणका; तब्बल ५३.६७ कोटी रुपये जप्त
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Asmita Patel : स्टॉक मार्केट इन्फ्लुएन्सर अस्मिता पटेल हिला सेबीचा मोठा दणका; तब्बल ५३.६७ कोटी रुपये जप्त

Asmita Patel : स्टॉक मार्केट इन्फ्लुएन्सर अस्मिता पटेल हिला सेबीचा मोठा दणका; तब्बल ५३.६७ कोटी रुपये जप्त

Published Feb 07, 2025 04:44 PM IST

Asmita Patel : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अस्मिता पटेल हिच्या विरोधात मोठी कारवाई करत सेबीनं तिची ५३.६७ कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

स्टॉक मार्केट इन्फ्लुएन्सर अस्मिता पटेल हिला सेबीचा मोठा दणका; तब्बल ५३.६७ कोटी रुपये जप्त
स्टॉक मार्केट इन्फ्लुएन्सर अस्मिता पटेल हिला सेबीचा मोठा दणका; तब्बल ५३.६७ कोटी रुपये जप्त

Sebi Action against Asmita Patel : भारतीय शेअर बाजारातील 'ऑप्शन क्वीन' आणि शी-वुल्फ म्हणून ओळखली जाणारी अस्मिता पटेल हिच्यावर सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड तथा सेबीनं मोठी कारवाई केली आहे. सेबीनं तिची कंपनी ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंगकडून ५३.६७ कोटी रुपये जप्त केले आहेत. 

अस्मिता पटेल हिच्याकडून जप्त करण्यात आलेली रक्कम हा २०२१ ते २०२४ या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शुल्कापोटी मिळालेल्या एकूण १०४ कोटी रुपयांच्या रकमेचा भाग आहे. उर्वरित रक्कमही का जप्त करू नये, अशी विचारणा सेबीनं केली आहे.

अस्मिता पटेल हिच्या युट्यूब चॅनेलचे ५२६००० सबस्क्रायबर्स आहेत. ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग नावानं ती एक कंपनीही चालवते. शेअर बाजाराशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावाखाली बेकायदेशीर गुंतवणुकीचा सल्ला देत असल्याच्या तिच्या कंपनीवर आरोप आहे. तिच्या विरोधात ४२ विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. या तक्रारींच्या चौकशीनंतर सेबीनं हे पाऊल उचललं आहे. 

अशीच कारवाई डिसेंबर २०२४ मध्ये रवींद्र बाळू भारती याच्यावर करण्यात आली होती. त्याचं यूट्यूब चॅनेल ४ एप्रिल २०२५ पर्यंत बंद राहणार आहे.

गुंतवणुकीचे वर्षच बदलले!

ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंगनं आपल्यापुरतं गुंतवणुकीचं वर्ष देखील बदलल्याचं बाजार नियामकाच्या निदर्शनास आलं आहे. हे नियमांचं उल्लंघन आहे. लेट्स मेक इंडिया ट्रेड (LMIT), मास्टर्स इन प्राइस अ‍ॅक्शन ट्रेडिंग (MPAT) आणि ऑप्शन्स मल्टिप्लायर (OM) हे त्यांच्या कंपनीचे लोकप्रिय कार्यक्रम आहेत. सेबी नोंदणीकृत नसलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची संख्या वाढत असल्याची चिंता सेबीनं व्यक्त केली आहे.

३०० टक्के परताव्याचा केला जायचा दावा

अस्मिता पटेल ग्लोबल स्कूल ऑफ ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या संचालकांनी ४ वर्षांत १२ लाख रुपये कमावले आहेत. हे लोक कोर्सची माहिती सांगताना ३०० टक्के नफ्याचं अमिष दाखवायचे. २०१९-२० ते ३० जानेवारी २०२४ या कालावधीत कंपनीनं हे पैसे कमावले आहेत. कंपनीनं १४० कोटी रुपयांच्या निधीचं व्यवस्थापन केल्याचा दावा केला होा. तोही पूर्णपणे खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Ganesh Pandurang Kadam

TwittereMail

गणेश कदम २०२२ पासून हिंदुस्तान टाइम्स- मराठीमध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहे. गणेश गेली २० वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून यापूर्वी लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, सामना या दैनिकांमध्ये काम केले आहे. राजकीय वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक राजकीय सभा, आंदोलने व विधीमंडळाची अधिवेशने कव्हर केली आहेत. २०१२ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारिता सुरू केली. गणेशला राजकारण, अर्थकारणाबरोबरच साहित्य व संगीत विषयक घडामोडींची विशेष आवड आहे.

Whats_app_banner