Upcoming IPO news : शेअर बाजारासाठी २०२४ हे वर्ष आयपीओ वर्ष ठरलं आहे. या वर्षात अनेक कंपन्यांनी आयपीओ लाँच केले असून नवनवे शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. या यादीत आता आणखी चार कंपन्यांची भर पडणार आहे. सेबीनं नुकतीच त्यासाठी मंजुरी दिली आहे.
सेबीनं दिलेल्या माहितीनुसार, फार्मा कंपनी रुबिकॉन रिसर्च, टीपीजी कॅपिटल समर्थित साई लाइफ सायन्सेस, सनातन टेक्सटाइल्स आणि ऑटो कंपोनेंट उत्पादक मेटलमॅन ऑटो या चार कंपन्यांना आयपीओ आणण्याची मान्यता देण्यात आली आहे.
रुबिकॉन रिसर्च, साई लाइफ सायन्सेस, सनातन टेक्सटाइल्स आणि मेटलमॅन ऑटो या चार कंपन्यांनी जुलै ते ऑगस्ट दरम्यान सेबीकडे आयपीओची कागदपत्रे दाखल केली होती. या कंपन्यांना ३१ ऑक्टोबर रोजी सेबीचे निष्कर्ष प्राप्त झाले. कोणत्याही कंपनीला आयपीओ आणण्यासाठी सेबीचा मान्यता आवश्यक असते.
रुबिकॉन रिसर्चच्या आयपीओ कागदपत्रांनुसार, या कंपनीच्या आयपीओचा आकार १०८५ कोटी रुपये आहे. यात ५०० कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स नव्यानं जारी केले जाणार आहेत. तर, प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर आरआर प्रायव्हेट लिमिटेड ५८५ कोटी रुपयांचे शेअर विक्रीस (OFS) काढणार आहे. जनरल अटलांटिकचा रुबिकॉन रिसर्चमध्ये सध्या ५७ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे.
हैदराबाद स्थित साई लाइफ सायन्सेसच्या प्रस्तावित आयपीओमध्ये ८०० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू असून प्रवर्तक, गुंतवणूकदार भागधारक आणि इतर भागधारकांच्या ६.१५ कोटी शेअर्सच्या ओएफएसचा समावेश आहे.
सनातन टेक्सटाइल्सचा आयपीओच्या माध्यमातून ५०० कोटी शेअर्स नव्यानं बाजारात आणले जाणार आहेत. तर, प्रवर्तक आणि प्रवर्तक समूहाच्या संस्थांचे ३०० कोटी रुपयांपर्यंतचे शेअर विक्रीस (OFS) काढले जाणार आहेत.
मेटलमॅन ऑटोचा प्रस्तावित आयपीओ हा ३५० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा नवा इश्यू आणि प्रवर्तकांकडून १.२६ कोटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) यांचं मिश्रण आहे. सप्टेंबरमध्ये आयपीओची कागदपत्रे दाखल करणाऱ्या बीएमडब्ल्यू व्हेंचर्सनं २८ ऑक्टोबर रोजी कागदपत्रे मागे घेतली आहेत.