front running news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून देणारे 'फ्रंट रनिंग' म्हणजे काय? का सुरू आहे चर्चा?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  front running news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून देणारे 'फ्रंट रनिंग' म्हणजे काय? का सुरू आहे चर्चा?

front running news : म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून देणारे 'फ्रंट रनिंग' म्हणजे काय? का सुरू आहे चर्चा?

Jun 24, 2024 07:07 PM IST

what is front running in MF : क्वांट म्युच्युअल फंडाच्या मुख्यालयांवर सेबीनं टाकलेल्या छाप्यानंतर 'फ्रंट रनिंग' विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया!

म्युच्युअल फंड जगतात खळबळ उडवून देणारे 'फ्रंट रनिंग' म्हणजे काय? का सुरूय चर्चा?.
म्युच्युअल फंड जगतात खळबळ उडवून देणारे 'फ्रंट रनिंग' म्हणजे काय? का सुरूय चर्चा?.

what is front running in security market : 'फ्रंट रनिंग' केल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (SEBI) क्वांट म्युच्युअलफंडाच्या दोन ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ९०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचं व्यवस्थापन (AUM - Asset Under Management) करणाऱ्या या फंडावरील कारवाईमुळं गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळं 'फ्रंट रनिंग' हा प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ही संकल्पना नेमकी आहे काय? जाणून घेऊया…

फ्रंट रनिंग म्हणजे काय?

> फ्रंट-रनिंगला ‘टेलगेटिंग’ असंही म्हणतात. बाजारात अफरातफर करण्याचा हा प्रकार आहे. भविष्यात होणाऱ्या व्यवहाराची आतल्या गोटातून मिळाल्यानंतर, त्या माहितीच्या आधारे एखाद्या ब्रोकर, डीलर किंवा कर्मचाऱ्यानं विशिष्ट स्टॉकमध्ये ट्रेडिंग केल्यास व त्यामुळं स्टॉकच्या किंमतीमध्ये उलथापालथ झाल्यास हा फ्रंट रनिंगचा प्रकार ठरतो.

> मे २०१२ मध्ये सेबीनं एका परिपत्रकात 'फ्रंट रनिंग'ची व्याख्या केली होती. त्यानुसार सार्वजनिकरित्या उपलब्ध नसलेल्या माहितीचा वापर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सिक्युरिटीजची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी किंवा पर्याय किंवा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश करण्यासाठी करणे आणि त्यातून सिक्युरिटीज किंवा कॉन्ट्रॅक्ट्सच्या किंमतींवर प्रभाव टाकणे हे 'फ्रंट रनिंग' ठरते.

> फ्रंट रनिंग ही एक अनैतिक प्रथा मानली जाते. कारण ब्रोकर किंवा डीलर्स त्यांच्या ग्राहकांना माहिती देण्याआधी त्यावर आधारित इक्विटीमध्ये व्यवहार करतात. फंड मॅनेजर/ब्रोकर एखाद्या भरीव ऑर्डरच्या अगोदर सिक्युरिटीजची खरेदी किंवा विक्री करतो किंवा त्याच किंवा संबंधित फ्युचर्स किंवा ऑप्शन कॉन्ट्रॅक्टमधील आगामी व्यवहारावर फ्युचर्स किंवा ऑप्शन पोझिशन घेतो.

फ्रंट रनिंग इनसाइडर ट्रेडिंगसारखेच आहे. यात फरक इतकाच आहे की फ्रंट-रनिंगच्या बाबतीत, माहिती थेट एखाद्या कंपनीशी संबंधित नसते. इनसाइडर ट्रेडिंगच्या बाबतीत, ही माहिती गोपनीय आणि कंपनीशी संबंधित असते. त्यात कंपनीच्या नफ्याचे अहवाल, विलिनीकरण, अक्विझिशन या माहितीच समावेश असतो. ही माहिती लोकांना उपलब्ध नसते.

> प्रभावी बाजार विश्लेषकांच्या शिफारशी लोकांपर्यंत जाण्याआधी त्यांचा वापर करणं हे देखील फ्रंट रनिंगच्या प्रकारात मोडतं. विश्लेषक त्यांच्या ग्राहकांना स्टॉक खरेदी, विक्री किंवा होल्ड करण्याबद्दल सल्ला देतात. हा सल्ला ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी दलालांकडून त्या आधारे व्यवहार केले जातात. याला देखील फ्रंट रनिंग म्हटलं जातं.

> खरेदी-विक्री-विक्री आणि विक्री-विक्री-खरेदी हे पॅटर्न ‘फ्रंट रनिंग’साठी सर्वसाधारणपणे वापरले जातात.

> 'खरेदी-खरेदी-विक्री' पॅटर्नमध्ये, फ्रंट रनर हा ग्राहकांच्या खरेदी करण्याआधीच गोपनीय माहितीच्या आधारे खरेदीची ऑर्डर देतो आणि नंतर विक्री करतो.

> ‘विक्री-विक्री-खरेदी’ पॅटर्नमध्येफ्रंट रनर हा लोकांना विक्रीची ऑर्डर देतो आणि मग स्वत: शेअर्स खरेदी करतो.

फ्रंट रनिंगचा गुंतवणूकदारांना कसा फटका बसतो?

'फ्रंट रनिंग'चा गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या म्युच्युअल फंडानं मोठ्या संख्येनं शेअर्स खरेदी करण्याची योजना आखली आणि अशा वेळी फ्रंट रनिंग झाल्यास त्या शेअर्सची किंमत वाढते. त्यामुळं म्युच्युअल फंडाला शेअर्ससाठी जास्त किंमत मोजावी लागते. यातून गुंतवणूकदारांचा संभाव्य परतावा कमी होतो.

दर सहा महिन्यांनी सादर करावं लागतं प्रमाणपत्र

म्युच्युअल फंड नियम, १९९६ मध्ये २५ जानेवारी २०२२ रोजी सेबीनं केलेल्या सुधारणेनुसार, म्युच्युअल फंडाच्या विश्वस्त मंडळानं किंवा विश्वस्त कंपनीनं दर सहा महिन्यांनी एक प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. कंपनीचे संचालक, प्रमुख कर्मचारी किंवा कोणत्याही विश्वस्तांकडून स्व-व्यवहार किंवा फ्रंट रनिंगचा प्रकार घडलेला नाही हे त्याद्वारे स्पष्ट करावं लागतं.

फ्रंट रनिंग बेकायदेशीर

भारतात फ्रंट रनिंग बेकायदेशीर आहे. मे २००१ च्या परिपत्रकात सेबीनं म्हटलं आहे की, कोणत्याही कर्मचाऱ्यानं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फ्रंट रनिंगचा कोणताही व्यवहार करण्यास सक्त मनाई आहे फ्रंट रनिंग आणि फसवणुकीच्या व्यवहारांना आळा घालण्यासाठी सेबीनं म्युच्युअल फंड नियमावलीत सुधारणा केली आहे. एप्रिलमध्ये सेबीनं आठ कंपन्यांवर बंदी घातली होती.

Whats_app_banner