State Bank Of India Q3 Results : स्टेट बँक ऑफ इंडियाचे तिमाही निकाल नुकतेच जाहीर झाले. बँकेच्या तिमाही नफ्यात तब्बल ८४ टक्के वाढ झाली आहे. असं असतानाही शेअरमध्ये आज मोठी घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात बँकेचा शेअर १.२८ रुपयांनी घसरून ७४२.६० रुपयांवर ट्रेड करत आहे.
तिमाही निकालाच्या आकडेवारीनुसार, एसबीआयच्या निव्वळ नफ्यात ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत ८४ टक्क्यांनी वाढ झाली असून तो १६,८९१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत बँकेला ९,१६४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत बँकेचा व्याजातून निव्वळ नफा ४ टक्क्यांनी वाढून ४१,४४६ कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ३९,८१६ कोटी रुपये होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचा खर्च १७ टक्क्यांनी घटून १६,०७४ कोटी रुपयांवर आला आहे.
एसबीआयच्या देशांतर्गत कर्जात १४.०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तीन तिमाहींसाठी बँकेचं निव्वळ व्याज मार्जिन (NIM) ३.१२ टक्के आहे, तर देशांतर्गत एनआयएम ३.२५ टक्के आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी घाऊक बँक एनआयएम ३.०१ टक्के आणि देशांतर्गत निम ३.१५ टक्के आहे.
डिसेंबर २०२४ अखेर सकल एनपीएचे प्रमाण घटून २.०७ टक्क्यांवर आलं आहे. मागील तिमाहीच्या (सप्टेंबर २०२४) अखेरीस ते २.१३ टक्के होतं. याच कालावधीत निव्वळ एनपीएचं प्रमाण ०.५३ टक्क्यांवर स्थिर राहिलं आहे.
तिसऱ्या तिमाहीत बँकेच्या ठेवी ९.८१ टक्क्यांनी वाढून ५२.३ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा ४७.६२ लाख कोटी रुपये होता.
स्टोक्सबॉक्सचे रिसर्च अॅनालिस्ट अभिषेक पंड्या म्हणाले, 'आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत निव्वळ व्याज उत्पन्न, उत्पन्न आणि तुलनेनं कमी क्रेडिट कॉस्टमध्ये सातत्यानं वाढ दाखवली आहे. एसबीआयचे निकाल अपेक्षेनुसार आहेत आणि मार्जिन, क्रेडिट सुधारणा आणि ठेवींच्या वाढीबाबत व्यवस्थापनाचा भविष्यातील दृष्टीकोन महत्त्वाचा राहील, असं ते म्हणाले.
चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बगरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एसबीआयच्या शेअरला ७२० रुपयांवर आधार दिसत आहे. इथून तो पुन्हा उसळी घेऊ शकतो. हा शेअर लवकरच ७८० आणि ८०० रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. त्यामुळं भागधारकांनी ७२० रुपयांवर स्टॉपलॉस कायम ठेवावा आणि वाट पाहावी.’
नवीन गुंतवणूकदार सुरुवातीला सध्याच्या बाजारभावानं खरेदी करू शकतात आणि ८०० रुपयांच्या अल्पमुदतीच्या उद्दिष्टासाठी घसरणीवर खरेदी सुरू ठेवू शकतात. मात्र, त्यांनीही ७२० रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा, असं बागरिया यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या