देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. स्टेट बँकेनं MCLR दर वाढवला आहे. नवीन दर १५ जुलै २०२४ म्हणजे आजपासूच लागू झाले आहेत. या वाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या कर्जाच्या हप्त्यावर होणार असून ईएमआय वाढणार आहे.
MCLR वाढल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा बेस लँडिंग रेट ८.१० टक्क्यांवरून ९ टक्के झाला आहे. १५ दिवसांच्या कालावधीसाठी MCLR दर ८.१० टक्के झाला आहे. १ महिन्याचा MCLR दर ८.३५ टक्के, ३ महिन्यांचा MCLR दर ८.४० टक्के, ६ महिन्यांचा MCLR दर ८.७५ टक्के आणि १ वर्षाचा MCLR दर ८.८५ टक्के झाला आहे. तर, १ वर्षासाठी हा दर ८.८५ टक्के, २ वर्षांसाठी आणि ३ वर्षांसाठी हा दर अनुक्रमे ८.९५ टक्के आणि ९ टक्के इतका आहे.
नव्या निर्णयानुसार, ३ महिने, ६ महिने आणि २ वर्षांच्या कर्जासाठी MCLR दर ०.१० टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. महिनाभरापूर्वीच स्टेट बँकेनं वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जासाठी एमसीएलआर रेटमध्ये ०.१० टक्क्यांची वाढ केली होती. त्यानंतर लगेचच पुन्हा हे दर वाढवले आहेत.
MCLR दर म्हणजे काय? (Marginal Cost of Funds based Lending Rate)
MCLR दर ही एक प्रकारची किमान व्याजदरावर घातलेली मर्यादा असते. या दरापेक्षा कमी दरानं बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. २०१६ साली ही पद्धत सुरू झाली. बहुतेक किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वाहन कर्जे MCLR दराशी जोडलेली असतात. त्यामुळं आगामी काळात ईएमआयमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बहुतांश कॉर्पोरेट कर्जांनाही याचा फटका बसणार आहे.
तुमचं १० लाखांचं गृहकर्ज एका वर्षाच्या MCLR शी जोडलेल्या व्याजदरावर असेल. तर, त्याचा एमसीएलआर आतापर्यंत ८.७५ टक्के होता. आता तो ८.८५ टक्के झाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया ७ दिवस ते १० वर्षांच्या मुदत ठेवीवर ४ टक्के ते ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज देते. २ वर्षे ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ७.५० टक्के व्याज मिळते.
स्टेट बँकेच्या शेअरही सातत्यानं वधारत आहे. मागच्या सहा महिन्यात एसबीआयच्या शेअरमध्ये सुमारे ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या हा शेअर ८८३ रुपयांवर ट्रेड करत आहे.
संबंधित बातम्या