गेल्या काही दिवसांपासून भारतीय स्टेट बँक इलेक्टोरल बॉन्ड वरून चर्चेत असून आता बँकेने मोठी अपडेट दिली आहे. जर तुमचेही खाते स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयमध्ये असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. एसबीआयच्या काही सेवा उद्या (२३ मार्च) रोजी बंद राहणार आहेत. या सेवांमध्ये नेट बँकिंगचाही समावेश आहे. पण ग्राहक यादरम्यान युपीआय लाइट आणि एटीएमच्या माध्यमातून सेवांचा वापर करु शकतात.
SBI ने एक परिपत्रक जारी करत याबाबत माहिती दिली आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, इंटरनेटशी संबंधित बँकिंग सेवा २३ मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांपासून ते २ वाजून १० मिनिटांपर्यंत बंद राहतील. या काळात ग्राहक इंटरनेट बँकिंग, योनो लाइट, योनो बिजनेस वेब आणि मोबाईल अॅप, योनो आणि युपीआयच्या सेवांचा वापर करु शकणार नाहीत. पण ग्राहक युपीआय लाइट आणि एटीएमच्या सेवांचा वापर करु शकतात.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार एसबीआय ग्राहक या काळात युपीआयचा वापर करु शकणार नाहीत. मात्र युपीआय लाइटचा वापर करत पेमेंट करु शकतात. त्याचबरोबर एटीएममधूनही पैसे काढू शकतात.
बँकिंग व्यवहाराबाबत ग्राहकांना काही समस्या आल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास बँकेने ग्राहकांच्या सुविधेसाठी काही टोल फ्री क्रमांक दिले आहेत. ग्राहक एसबीआयच्या टोल फ्री क्रमांक १८०० १२३४ आणि १८०० २१०० वर कॉल करू शकतात. याशिवाय एसबीआयच्या वेबसाइटवर जाऊनही आपल्याला हवी असलेली माहिती मिळवू शकतात.