SBI Loan Interest rate hike : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एसबीआयनं विविध कालावधीसाठी मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्ये (MCLR) १० बेसिस पॉईंटची वाढ जाहीर केली आहे. नवे दर आज, १५ ऑगस्ट २०२४ पासून लागू झाले आहेत.
एसबीआयनं (SBI) एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा हा सलग तिसरा महिना आहे. एसबीआयचा नवीन एमसीएलआर आता तीन वर्षांच्या कालावधीसाठी ९ टक्क्यांवरून ९.१० टक्क्यांपर्यंत वाढला आहे, तर रात्रीचा एमसीएलआर ८.१० टक्क्यांवरून ८.२० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
एक रात्र : ८.१० टक्क्यांवरून ८.२० टक्क्यांपर्यंत वाढ
एक महिना : ८.३५ टक्क्यांवरून ८.४५ टक्क्यांपर्यंत वाढ
तीन महिने: ८.४० टक्के ते ८.५० टक्के
सहा महिने: ८.७५ टक्के ते ८.८५ टक्के
एक वर्ष: ८.८५ टक्के ते ८.९५ टक्के
दोन वर्ष: ८.९५ टक्के ते ९.०५ टक्के
तीन वर्ष: ९ टक्के ते ९.१० टक्के
सरकारी बँकेनं जून २०२४ पासून काही कालावधीत एमसीएलआरमध्ये ३० बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे. एमसीएलआर हा किमान व्याजदर आहे, ज्या दरापेक्षा कमी दरानं कोणतीही बँक कर्ज देऊ शकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) परवानगी दिलेल्या काही प्रकरणांचा यात अपवाद केला जातो.
एमसीएलआर दरात वाढ झाल्यानं गृहकर्ज, कार लोन, एज्युकेशन लोन सारखे कर्ज ग्राहकांसाठी महागणार आहे. रिझर्व्ह बँकेनं एप्रिल २०१६ मध्ये पूर्वीच्या बेस रेट प्रणालीची जागा घेत कर्जाच्या दरांसाठी बेंचमार्क म्हणून एमसीएलआर सादर केला होता.
याआधी बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि युको बँक यासारख्या अन्य काही सरकारी बँकांनीही वेगवेगळ्या कालावधीसाठी एमसीएलआर किंवा कर्जाच्या दरात वाढ केली आहे. परिणामी ग्राहकांवर कर्जाचा बोजा वाढला आहे.
बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेनं १२ ऑगस्टपासून एमसीएलआरमध्ये बदल केला आहे, तर युको बँकेने १० ऑगस्ट २०२४ पासून विशिष्ट कालावधीसाठी कर्जाच्या दरात वाढ केली आहे.
रिझर्व्ह बँकेनं ८ ऑगस्ट रोजी रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला होता. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं (MPC) धोरणात्मक दर कायम ठेवले आणि धोरणात्मक भूमिकाही 'जैसे थे' ठेवली.