Savings Accounts Intrest Of Indian Bank: आज लोकांकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी बहुतांश ग्राहक अजूनही बँकांवर अधिक विश्वास ठेवतात. यामुळेच लोक बँकांमध्ये मुदत ठेवी ठेवतात. तर काही लोक बचत खात्यातच पैसे ठेवणे पसंत करतात. बचत खात्यात पैसे ठेवल्यास ग्राहकांना व्याजही मिळते. आज आम्ही तुम्हाला देशातील काही प्रमुख बँकांच्या बचत खात्याच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत. या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी), कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे.
एसबीआय : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना एक कोटी रुपयांपर्यंतच्या बचत ठेवींवर ३.५० टक्के व्याज देते. एक कोटीरुपयांपेक्षा जास्त रकमेवर हा व्याजदर वार्षिक ४ टक्के आहे.
कोटक महिंद्रा बँक : खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्यातील एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर ४.५ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. एक लाखरुपयांपेक्षा जास्त आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेवरील व्याजदर सहा टक्क्यांवर कायम आहे. त्याचप्रमाणे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत खात्यावरील शिल्लक रकमेवरील व्याजदर ५.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
बँक ऑफ बडोदा : बँक ऑफ बडोदा (बीओबी) बद्दल बोलायचे झाले तर बचत खात्यावर ३.५० टक्के ते ४.०० टक्के व्याज मिळते.
एचडीएफसी बँक : एचडीएफसी बँक ५० लाख रुपयांपेक्षा कमी बचत ठेवींवर वार्षिक ३.५० टक्के व्याज देत आहे. एचडीएफसी बँक या रकमेपेक्षा जास्त रकमेवर वार्षिक ४ टक्के व्याज दर देते.
आयसीआयसीआय बँक : आयसीआयसीआय बँकही आपल्या ग्राहकांना एचडीएफसीप्रमाणेच व्याज दर देते. ५० लाखरुपयांपेक्षा कमी रकमेच्या खात्यावरील व्याजदर ३.५ टक्के आहे. ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बॅलन्सवर ४ टक्के व्याज दर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमानुसार व्याजाची रक्कम तिमाही आधारावर ग्राहकाला जमा केली जाते.