Saraswati Saree IPO : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसाठी प्रारंभिक भाग विक्री (IPO) हा एक पर्याय असतो. अनेक गुंतवणूकदार केवळ आयपीओमध्ये गुंतवणूक करत असतात. अशा गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. साड्यांची विक्री करणाऱ्या एका कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येत आहे.
सरस्वती साडी डेपो लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. साडी होलसेल सेगमेंट (बीटूबी) मधील ही आघाडीची कंपनी आहे. येत्या १२ ऑगस्टपासून या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओसाठी १५२ ते १६० रुपये असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती कंपनीनं दिली आहे.
सरस्वती साडी आयपीओच्या एक लॉटमध्ये ९० शेअर्स मिळणार आहेत. त्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १४,४०० रुपये सट्टा लावावा लागणार आहे. हा आयपीओ १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे. ही कंपनी बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर सूचीबद्ध होणार आहे. आयपीओवर सट्टा लावणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्सचं वाटप १६ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.
या आयपीओच्या माध्यमातून बाजारातून १६०.०१ कोटी रुपये उभे करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ०.६५ कोटी नवे शेअर्स विक्रीस काढणार आहे. तर, ऑफर फॉर सेल अंतर्गत ३५ लाख शेअर्स जारी केले जातील. आयपीओपैकी ५० टक्के हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांकडं आहे. तर, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान १५ टक्के राखीव ठेवण्यात येणार आहे. आयपीओसाठी युनिस्टोन कॅपिटलची लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा एकूण महसूल ६१० कोटी रुपये होता. या कालावधीत त्यांचा निव्वळ नफा २९.५२ कोटी रुपये होता. या कंपनीची स्थापना १९९६ मध्ये कोलकाता इथं झाली. कंपनी वाराणसी, मऊ, मदुराई, कोलकाता आणि बेंगळुरू इथून साड्या मागवते. महाराष्ट्रात या कंपनीचे दोन स्टोअर्स आहेत.