samvardhana motherson shares Price : कंपनीनं घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटत असतात. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या बाबतीतही असंच झालं आहे. आज कंपनीच्या शेअरमध्ये मंगळवारी कमालीची वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी 'अॅपल'साठी काम करण्याच्या निर्णयानंतर ही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट एक्सपर्ट्सनीही गुंतवणूकदारांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
संवर्धन मदरसनच्या शेअरमध्ये आज तब्बल ६ टक्क्यांची वाढ झाली. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरनं आज १८५.८० रुपयांचा उच्चांक नोंदवला. निफ्टीवर सध्या हा शेअर १८०.८७ रुपयांवर व्यवहार करत आहे.
'इकॉनॉमिक टाइम्स'नं दिलेल्या वृत्तानुसार, विवेक चंद सहगल यांच्या नेतृत्वाखालील ऑटो पार्ट्स उत्पादक कंपनी हाँगकाँग स्थित बीआयईएल क्रिस्टल मनुखाना या जागतिक पातळीवरील आघाडीच्या स्मार्टफोन ग्लास सप्लायरच्या सहकार्यानं भारतात अॅपलच्या पुरवठा साखळीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या दोन कंपन्या संयुक्त सहकार्यातून दक्षिण भारतात दोन ते अडीच हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्प उभारण्याची शक्यता आहे. हा संयुक्त प्रकल्प सुरू केल्यानंतर चार ते पाच वर्षांत ८,५०० कोटी रुपयांपर्यंतच्या महसुलाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
यावर्षी जानेवारी महिन्यात संवर्धन मदरसननं बीआयईएल क्रिस्टल (सिंगापूर) प्रायव्हेट लिमिटेडसोबत कराराची घोषणा केली होती. या करारानुसार, बीआयईएल संवर्धन मदरसनच्या पूर्ण मालकीची उपकंपनी मदरसन इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (एमईसीपीएल) मध्ये गुंतवणूक करणार आहे.
जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांनी लावलेल्या विक्रीच्या सपाट्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी संवर्धन मदरसनच्या शेअरमध्ये ८.५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मात्र, यावर्षी एप्रिल ते जुलै या कालावधीत या शेअरमध्ये मोठी वाढ झाली आहे. या काळात शेअरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये हा शेअर १२.५ टक्के, मे महिन्यात १५.३ टक्के, जूनमध्ये २५.८ टक्के आणि जुलैमध्ये ३.३ टक्क्यांनी वधारला.
संवर्धन मदरसनवर बारकाईनं लक्ष ठेवून असलेल्या २३ विश्लेषकांपैकी १९ विश्लेषकांनी शेअरला 'बाय' रेटिंग दिलं आहे. एका विश्लेषकानं शेअर 'होल्ड' करण्याचा सल्ला दिला आहे, तर इतर तिघांनी विक्रीची शिफारस केली आहे. २०२४ मध्ये हा शेअर आतापर्यंत ७५ टक्के वधारला आहे. २०१४ नंतर कॅलेंडर वर्षातील ही शेअरची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०१४ साली याच कालावधीत हा शेअर १५० टक्क्यांपेक्षा जास्त वधारला होता.