कधी काळी फक्त ५३ पैसे भाव असलेल्या या शेअरनं अवघ्या १० हजार रुपयांचे ३ कोटी केले! कसा झाला हा चमत्कार?-samvardhana motherson share crossed 210 rupee from 53 paisa since 2000 company given 5 bonus shares ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  कधी काळी फक्त ५३ पैसे भाव असलेल्या या शेअरनं अवघ्या १० हजार रुपयांचे ३ कोटी केले! कसा झाला हा चमत्कार?

कधी काळी फक्त ५३ पैसे भाव असलेल्या या शेअरनं अवघ्या १० हजार रुपयांचे ३ कोटी केले! कसा झाला हा चमत्कार?

Oct 02, 2024 03:51 PM IST

Samvardhana motherson share price : संवर्धना मदरसन इंटरनॅशनलचा शेअर ५३ पैशांवरून २१० रुपयांवर पोहोचला असून गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे.

पाच वेळा बोनस शेअर्स देणाऱ्या या कंपनीनं अवघ्या १० हजाराचे ३ कोटी केले!
पाच वेळा बोनस शेअर्स देणाऱ्या या कंपनीनं अवघ्या १० हजाराचे ३ कोटी केले!

Samvardhana motherson share price : शिस्त आणि संयम हा शेअर बाजारातील यशाचा मूलमंत्र आहे असं अनेक दिग्गज सांगतात. त्यांचे हे अनुभवाचे बोल संवर्धना मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरनं खरे करून दाखवले आहेत. या शेअरनं गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. 

गेल्या २४ वर्षांत संवर्धना मदरसनचा शेअर ५३ पैशांवरून २१० रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत कंपनीच्या शेअरमधील १० हजारांची गुंतवणूक ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. बोनस शेअर्समुळं हा चमत्कार घडला आहे. कंपनीनं गेल्या २४ वर्षांत ५ वेळा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले आहेत. 

असं आहे करोडोंच्या कमाईचं गणित

६ ऑक्टोबर २००० रोजी संवर्धना मदरसन इंटरनॅशनलचा शेअर ५३ पैशांवर व्यवहार करत होता. एखाद्या व्यक्तीनं त्यावेळी या शेअर्समध्ये १०,००० रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला कंपनीचे १८,८६६ शेअर्स मिळाले असते. कंपनीनं २००० पासून ५ वेळा आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स भेट दिले आहेत. हे बोनस शेअर्स जोडल्यास एकूण शेअर्सची संख्या १,४३,२५३ इतकी होते. १ ऑक्टोबर २०२४ रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचा शेअर २१०.५० रुपयांवर बंद झाला. त्यानुसार १,४३,२५३ समभागांचे सध्याचे मूल्य ३.०१ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, कंपनीनं दिलेला लाभांश यात समाविष्ट केलेला नाही.

कंपनीनं किती दिले बोनस शेअर्स?

मदरसन इंटरनॅशनलनं २००० पासून आतापर्यंत पाच वेळा बोनस शेअर्सचे वाटप केलं आहे. कंपनीनं नोव्हेंबर २००० मध्ये १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. म्हणजेच प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिला. त्यानंतर ऑक्टोबर २०१२ मध्ये पुन्हा १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स दिले. डिसेंबर २०१३, जुलै २०१७ मध्ये पुन्हा १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले. कंपनीनं आपला शेवटचा बोनस शेअर ऑक्टोबर २०२२ मध्ये दिला होता, तेव्हा देखील कंपनीनं १:२ च्या प्रमाणात बोनस शेअर्सचं वाटप केलं. 

ऑटो कंपोनेंट आणि इक्विपमेंट इंडस्ट्रीशी संबंधित कंपनी संवर्धना मदरसन इंटरनॅशनलच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २१७ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८६.८० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner