Samsung Health App New Feature: इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक सॅमसंगने त्यांच्या सॅमसंग हेल्थ अॅपमध्ये नवीन हेल्थ रेकॉर्ड नावाचे फीचर्स जोडले आहे. या फीचर्सच्या मदतीने ग्राहकांना आपल्या आरोग्याशी संबंधित योग्य आणि पटकन माहिती मिळवण्यास मदत होईल. एवढेच नव्हेतर, वापरकर्ते या फीचर्सच्या मदतीने आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट बनवू किंवा अॅक्सेस करू शकतात. हे फीचर्स वापरकर्त्यांना त्यांचा आरोग्य डेटा सेव्ह करण्यास मदत करेल, जो भारतातील विविध आरोग्य सेवा प्रदात्यांद्वारे तयार केला जातो.
सॅमसंगचे हेल्थ रेकॉर्ड्स फिचर्स सुरक्षित आहे. या फीचरमुळे वापरकर्त्यांची पेपरवर्कपासून सुटका होणार आहे. कारण वापरकर्त्यांना आता डिजिटल पद्धतीने त्यांच्या आरोग्याशी संबंधित माहिती अपलोड किंवा सेव्ह करता येणार आहे. नोंदणीकृत वापरकर्ते त्यांच्या अद्वितीय आभा आयडीशी लिंक असलेला त्यांची मेडिकल हिस्ट्री, तसेच प्रीस्क्रिप्शन्स, लॅबोरेटरी रिपोर्ट आणि हॉस्पिटल व्हिझिट्स घसबसल्या एका क्लिकवर पाहू शकतात.
सॅमसंगचा हा नवीन उपक्रम भारतातील डिजिटल आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वापरकर्त्यांना सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हे फीचर्स भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या अनुषंगाने विकसित करण्यात आले आहे. यामुळे केवळ डिजिटल आरोग्य क्षेत्रात सुधारणा होणार नाही तर, वापरकर्त्यांना सुरक्षित आणि अखंड आरोग्यसेवेचा अनुभव देखील मिळेल.
नोएडा येथील सॅमसंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक क्युंगह्यून र्यू म्हणाले, 'सॅमसंग नेहमीच आपल्या ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देते. वापरकर्त्यांची आरोग्याशी संबंधित माहिती सेव्ह आणि सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने सॅमसंग हेल्थ अॅपमध्ये हेल्थ रेकॉर्ड फीचर जोडण्यात आले. या फीचरमुळे वापरकर्त्याला आतापर्यंत त्यांच्यावर झालेल्या उपचाराची माहिती मिळू शकते, जी कोणत्याही क्षणी डॉक्टर आणि आपल्या नातेवाईकांशी शेअर करणे सोपे होईल.
हेल्थ रेकॉर्ड्स फीचर सॅमसंगच्या आर अँड डी, यूएक्स डिझाइन आणि कंझ्युमर एक्सपिरीयन्स टीमने भारतातील आघाडीच्या एबीडीएम-प्रमाणित अॅग्रीगेटर इका केअरच्या सहकार्याने विकसित केले आहे. या फीचरद्वारे वापरकर्ते सॅमसंग हेल्थ अॅपमध्ये आधार किंवा मोबाईल नंबरच्या मदतीने आयुष्मान भारत हेल्थ अकाउंटसाठी सहजपणे नोंदणी करू शकतात.
संबंधित बातम्या