Share Market News in Marathi : सॅगिलिटी इंडियाच्या शेअरमधील तेजी गेल्या ८ दिवसांपासून कायम असून आज, गुरुवारी शेअरला ५ टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. शेअरचा भाव आज ५१.३५ रुपयांवर स्थिरावला. गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावला असून त्यामुळं मागच्या आठ सत्रात शेअरमध्ये तब्बल २९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
सॅगिलिटी इंडियाचा शेअर १२ नोव्हेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर ३१.०६ रुपयांवर सूचीबद्ध झाला. आयपीओमधील ३० रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा ही किंमत ३.५ टक्के जास्त होती. तेव्हापासून आतापर्यंत हा शेअर इश्यू प्राइसपेक्षा ७१ टक्क्यांनी व लिस्टिंग प्राइसपेक्षा ६५ टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच मागच्या अवघ्या दीड महिन्यांत गुंतवणूकदारांना ६५ टक्के नफा झाला आहे.
गेल्या आठवड्यात जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजनं खरेदीची शिफारस करतानाच शेअरला ५२ रुपयांचं टार्गेट प्राइस दिलं होतं. त्यानंतर सॅगिलिटी इंडियाच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.
जेपी मॉर्गन या आणखी एका परदेशी ब्रोकरेज फर्मनंही कंपनीच्या शेअरवर विश्वास व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२७ मध्ये सगिलिटीचे ईबीआयटी मार्जिन जवळजवळ दुप्पट होऊन १६.५ टक्के होईल, परिणामी आर्थिक वर्ष २०२५-२७ मध्ये ईबीआयटीमध्ये ३१ टक्के सीएजीआर होईल.
याशिवाय, मालमत्ता विक्रीतून कर्ज फेडल्यास आर्थिक वर्ष २०२५-२७ मध्ये कर्जावरील व्याजाचा खर्च कमी होईल. त्यामुळं आर्थिक वर्ष २०२५-२७ मध्ये उत्पन्नवाढ ४० टक्के एजीआरपर्यंत वाढेल, असं जेफरीजनं म्हटलं आहे.
सॅगिलिटी इंडिया ही आरोग्यसेवा-केंद्रित बीपीएम (Business Process Management) फर्म आहे. डोमेन कौशल्य आणि एन्ड-टू-एन्ड सेवा ऑफर करणारी ही कंपनी बाजारपेठेत अधिकाधिक हिस्सा मिळविण्यासाठी सक्षम आहे.
सॅगिलिटी इंडियाचा आयपीओ ५ ते ७ नोव्हेंबर दरम्यान खुला झाला होता. सुमारे २१०६.६० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ३.२ पट सबस्क्रिप्शन मिळालं. हा ७.२२ कोटींचा पूर्णपणे नव्या इक्विटी शेअर्सच्या विक्रीचा प्रस्ताव होता. सॅगिलिटी इंडियाचा आयपीओ प्राइस बँड २८ ते ३० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता.
आज सकाळी सव्वाअकरा वाजता बीएसईवर सॅलिटी इंडियाचा शेअर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ५१.३५ रुपयांवर बंद झाला. कंपनीचं बाजार भांडवल २४,००० कोटी रुपयांहून अधिक आहे.
संबंधित बातम्या