s p apparels share price : बांगलादेशमधील राजकीय संकटाचे पडसाद भारतीय उद्योग क्षेत्रात व पर्यायानं शेअर बाजारातही उमटत आहेत. तिथल्या संकटाचा सर्वाधिक फायदा टेक्सटाइल क्षेत्रातील भारतीय कंपन्यांना होणार आहे. याचाच परिणाम म्हणून या कंपन्यांचे शेअर वाढत आहेत. एसपी अपॅरल्स लिमिटेड (SPAL) या कंपनीच्या शेअरनं तर कमालच केली आहे. अवघ्या दोन दिवसांत या कंपनीच्या शेअरमध्ये ४४ टक्के वाढ झाली आहे.
मुंबई शेअर मार्केटमध्ये बुधवारी एसपी अपॅरल्स लिमिटेडचा शेअर २० टक्क्यांनी वधारून १,१३३ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्सनी बुधवारी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. या शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर ४२९.४० रुपये आहे.
मागच्या दोन दिवसांत अपॅरल्स कंपनीचा शेअर ७९० रुपयांवरून ११३३ रुपयांवर पोहोचला आहे. तर, ४ जून २०२४ च्या पातळीपासून या शेअरमध्ये ११४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर ४ जून रोजी ५३० रुपयांवर होता. तो आज ११३३ रुपयांवर पोहोचला आहे.
एसपी अपॅरल्स लिमिटेडच्या शेअरमध्ये या कॅलेंडर वर्षात आतापर्यंत ८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षी १ जानेवारी रोजी कंपनीचा शेअर ६०५.८० रुपयांवर होता. तो आज, ७ ऑगस्ट २०२४ रोजी ११३३ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात एसपी अपॅरल्स लिमिटेडच्या शेअरमध्ये १३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ७ ऑगस्ट २०२३ रोजी कंपनीचा शेअर ४५२.१५ रुपयांवर होता, तो आज ११३३ रुपयांवर पोहोचला आहे.
बांगलादेशला निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत वस्त्रोद्योग क्षेत्र आहे. दर महिन्याला बांगलादेशची कपड्यांची निर्यात ३.५ ते ३.८ अब्ज डॉलर इतकी आहे. युरोपियन युनियन आणि युनायटेड किंग्डममध्ये बांगलादेशचा निर्यात बाजारातील वाटा दोन आकडी आहे. तर, अमेरिकेच्या बाजारपेठेत बांगलादेशचा मार्केट शेअर १० टक्के आहे. एस. पी. अपॅरल्स लिमिटेड ही कंपनी प्रौढांसह नवजात बालके आणि लहान मुलांच्या विणलेल्या कपडाच्या उद्योगातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे.