RVNL Share Price : रेल्वे क्षेत्रातील दोन कंपन्यांची स्थिती शेअर बाजारात आज अत्यंत वाईट आहे. रेल विकास निगम लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. खराब तिमाही निकाल हे या घसरणीमागचं कारण आहे.
लोकप्रिय मल्टीबॅगर रेल्वे स्टॉक रेल विकास निगमच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. आरव्हीएनएलचा शेअर आज बाजारात ४४८.२० रुपयांवर उघडला. बीएसईमध्ये कंपनीचा इंट्रा-डे नीचांकी स्तर ७ टक्क्यांनी घसरून ४४४ रुपयांवर आला.
रेल्वे विकास निगम लिमिटेडचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल चांगले नाहीत. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २७.२६ टक्क्यांनी घटून २८६.८९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३९४.४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. वार्षिक आधारावर महसुलातही घट झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचे एकूण उत्पन्न ४८५४.९५ कोटी रुपये आहे.
इरकॉन इंटरनॅशनल या रेल्वे शेअरच्या किमतीतही घसरण पाहायला मिळाली आहे. बीएसईवर हा शेअर २०५.८० रुपयांवर उघडल्यानंतर २०२.३० रुपयांवर घसरला. इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअर्सच्या घसरणीमागे तिमाही निकालही कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
कंपनीने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने जाहीर केलेल्या निकालानुसार निव्वळ नफ्यात १७.९० टक्के घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २०५.९० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २५०.८० कोटी रुपये होता.