Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपया ८७ च्या नीचांकी पातळीवर; महागाईचा भडका उडण्याची शक्यता
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपया ८७ च्या नीचांकी पातळीवर; महागाईचा भडका उडण्याची शक्यता

Rupee Vs Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपया ८७ च्या नीचांकी पातळीवर; महागाईचा भडका उडण्याची शक्यता

Feb 03, 2025 11:17 AM IST

Dollar vs Rupee : भारतीय रुपया आज डॉलरच्या तुलनेत ५४ पैशांच्या घसरणीसह ८७.१६ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. येत्या काळात रुपयाच्या अधिक घसरणीची शक्यता असून त्यामुळं महागाईचा भडका उडण्याची भीती आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयानं तळ गाठला! पहिल्यांदाच ८७ रुपयांवर पोहोचला!
डॉलरच्या तुलनेत रुपयानं तळ गाठला! पहिल्यांदाच ८७ रुपयांवर पोहोचला!

Exchange Rate News : केंद्रीय अर्थसंकल्पाचं विश्लेषण सुरू असताना आर्थिक पातळीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीची घसरण सुरू आहे तर, रुपयांचं मूल्य डॉलरच्या तुलनेत कमालीचं घसरलं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांच्या मोठ्या घसरणीसह ८७.१६ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. जाणकारांच्या मते, येत्या ६ ते १० महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ९० ते ९२ पर्यंत खाली येऊ शकतो. त्यामुळं महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांतून आयात मालावर व्यापारी कर लादल्यानंतर अमेरिकी डॉलरमध्ये वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आशियाई चलनात घसरण होत असून सोमवारी भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला. रुपयानं प्रथमच ८७ चा टप्पा ओलांडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन आणि बहुतेक कॅनेडियन आयातीवर २५ टक्के आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के शुल्क लादलं आहे.

किती आणि कशी झाली घसरण?

डॉलरच्या तुलनेत रुपया ०.५ टक्क्यांनी घसरून ८७.०७ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. काही वेळानं तो ८७.२८ वर पोहोचला. डॉलर निर्देशांक ०.३ टक्क्यांनी वधारून १०९.८ वर गेल्यामुळं आशियाई चलन कमकुवत झालं. चिनी युआन ०.५ टक्क्यांनी घसरून ७.३५ प्रति अमेरिकन डॉलरवर होता.

सर्वसामान्यांचं बजेट कोलमडणार

डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीचा फटका सर्वसामान्यांनाही बसणार आहे. भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आणि डाळींची आयात करतो. डॉलरच्या महागाईमुळं तेल आणि डाळींसाठी अधिक खर्च करावा लागणार असून, त्याचा परिणाम त्यांच्या किमतींवर होणार आहे. अशावेळी स्वयंपाकघराचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे. याशिवाय परदेशी शिक्षण, प्रवास, डाळी, खाद्यतेल, कच्चे तेल, संगणक, लॅपटॉप, सोनं, औषधं, रसायनं, खतं आणि आयात होणारी अवजड यंत्रसामुग्री महाग होऊ शकते.

रुपयाच्या घसरण्याची प्रमुख कारणं

> परदेशी गुंतवणूकदार जेव्हा भारतीय बाजारातून पैसे काढतात तेव्हा डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. त्याचबरोबर जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता असताना गुंतवणूकदार डॉलरकडं धाव घेतात, ज्यामुळे डॉलर मजबूत होतो आणि रुपयासारख्या इतर चलनांना कमकुवत होते.

> भारत हा कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार देश आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की भारताला अधिक डॉलर खर्च करावे लागतात. त्यामुळं डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो.

> जेव्हा भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होते, तेव्हा व्यापारी तूट वाढते. त्यामुळं डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. 

> अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं व्याजदर वाढवले तर अमेरिकन रोखे आणि इतर गुंतवणुकीचे पर्याय अधिक आकर्षक बनतात. यामुळं परकीय भांडवल अमेरिकेत जाते आणि डॉलर मजबूत होतो, तर रुपया कमकुवत होतो.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner