Stock Market News : शिस्त आणि संयम हा शेअर बाजारातील यशाचा मंत्र समजला जातो. मात्र सगळेच हा मंत्र अमलात आणतात किंवा सगळ्यांना ते शक्य होत असं नाही. मात्र ज्यांना शक्य होतं, त्यांना त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडिया (TRIL) लिमिटेडचे गुंतवणूकदार सध्या हाच अनुभव घेत आहेत.
भारतातील ट्रान्सफॉर्मर उत्पादकांपैकी एक असलेल्या या कंपनीच्या शेअरच्या किंमतींमध्ये अलीकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. हा शेअर सातत्यानं विक्रमी उच्चांक गाठला आहे. विशेषत: घसरणीनंतर लगेचच सावरण्याची मजबूत क्षमता या शेअरनं दाखवली आहे. किंबहुना दुप्पट वेगानं उसळी मारली आहे. त्यामुळं मागच्या अवघ्या पाच वर्षांत शेअरहोल्डर्स करोडपती झाले आहेत.
गेल्या दोन वर्षांत कंपनीचे शेअर्स ७४.५० रुपयांवरून ९४६ रुपयांच्या सध्याच्या ट्रेडिंग प्राइसवर पोहोचले आहेत. ही वाढ १,१६९ टक्क्यांची आहे. गेल्या पाच वर्षांत या शेअरनं त्यापेक्षाही जास्त परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर ८ रुपयांवरून ११,७२५ टक्क्यांनी वधारला आहे. एखाद्या गुंतवणूकदारानं या कालावधीच्या सुरुवातीला शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आजपर्यंत गुंतवणूक कायम ठेवली असती, तर पाच वर्षांत हे मूल्य १.१८ कोटी रुपयांपर्यंत वाढलं असतं.
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्सच्या शेअर्सच्या किमतीत झालेली लक्षणीय वाढ ही देशांतर्गत व देशाबाहेरील अधिकाधिक ऑर्डर्स, चांगली आर्थिक कामगिरी आणि देशातील विजेच्या वाढत्या मागणीचा परिणाम आहे. याशिवाय ही कंपनी हायड्रोजन ऊर्जा क्षमतेचा विस्तारावर काम करत आहे.
अलीकडच्या वर्षांत, ट्रान्सफॉर्मर उद्योग मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवित झाला आहे, मुख्यत: सरकारच्या भांडवली खर्च योजना, भारत आणि जगभरातील वीज प्रकल्पांमधील क्षमतावाढ आणि पायाभूत सुविधांच्या मोठ्या विकास यासारख्या अनेक घटकांमुळे यास चालना मिळाली आहे. या घटकांमुळं टीआरआयएलसारख्या ट्रान्सफॉर्मर उत्पादकांचा फायदा झाला आहे.
डिसेंबर अखेर संपलेल्या तिमाहीत (आर्थिक वर्ष २०२५) कंपनीला ६३१ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या असून कंपनीचे ३,६८६ कोटी रुपयांचे ऑर्डर बुक आहे. तसंच, १९ हजार कोटी रुपयांच्या कंत्राटांची प्रक्रिया सुरू असल्याचं कंपनीच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
टीआरआयएल वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण, रेल्वे, नुतनीकृत ऊर्जा, पायाभूत सुविधा, औद्योगिक उत्पादन यासह विविध क्षेत्रांमध्ये सेवा देते. कंपनीची भारतात मजबूत बाजारपेठ आहे. कंपनीनं आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व आणि त्यापलीकडं विविध देशांमध्ये उत्पादनांची निर्यात करून जागतिक स्तरावर जम बसवला आहे.
कंपनीच्या उत्पादनांत वैविध्य असून त्यात ५०० एमव्हीए आणि १२०० केव्ही क्लासपर्यंत पॉवर ट्रान्सफॉर्मर, फर्नेस ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर आणि वितरण ट्रान्सफॉर्मर तसेच स्पेशालिटी ट्रान्सफॉर्मर यांचा समावेश आहे.
कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीनं नूतनीकरणक्षम विभागात क्षमता वाढविणे, निर्यातीवर लक्ष केंद्रित करणे, पूर्ण मागास एकात्मता प्राप्त करणे, ऑपरेशनल उत्कृष्टता आणि संसाधनांची जमवाजमव करणे आणि तांत्रिक प्रगती स्वीकारणे, या पाच धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
नुतनीकृत ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनी सज्ज आणि सक्षम आहे. भविष्यात नुतनीकरणक्षम ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता अनेक पटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. निर्यात बाजारात आपले स्थान आणि उपस्थिती वाढविण्यासाठीही कंपनी रोडमॅप तयार करत आहे. पुढील दोन वर्षांत निर्यातीतून मिळणाऱ्या महसुली योगदानात २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या