Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

Penny stock turns multibagger : दीड रुपयाचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?

May 16, 2024 03:55 PM IST

Penny Stock turns multibagger : चार वर्षांपूर्वी अवघा १.५८ रुपये असलेला वन पॉइंट वन सोल्युशन्स या कंपनीचा शेअर आज ५५ रुपयांवर ट्रेड करत आहे.

दीड रुपयांचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय?
दीड रुपयांचा शेअर ५५ रुपयांवर पोहोचला! गुंतवणूकदारांनी किती कमावले माहित्येय? (Photo: Pixabay)

One Point One Solutions share price : व्यवसायात जम बसला तर एखादी कंपनी काय करू शकते याचं उदाहरण वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेडनं घालून दिलं आहे. अवघ्या चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. चार वर्षांपूर्वी पेनी स्टॉक असलेला हा शेअर आज १,१८४ कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह स्मॉल कॅप स्टॉक बनला आहे. गेल्या चार वर्षांत या शेअरनं गुंतवणूकदारांना तीन हजार टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

शेअरच्या किमतीचा इतिहास

२९ नोव्हेंबर २०१९ रोजी हा वन पॉइंट वन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर १.५८ रुपयांवर होता, तो आज ५५ रुपयांवर पोहोचला आहे. मागच्या अवघ्या एका महिन्यात या शेअरची किंमत ५१.९५ रुपयांवरून ५५ रुपयांवर गेली आहे. म्हणजेच त्यात ७ टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे.

सहा महिन्यांच्या कालावधीत एनएसईवर सूचीबद्ध असलेल्या या शेअरमध्ये जवळपास ४० टक्क्यांची भरघोस वाढ झाली आहे. वर्षभराचा विचार केल्यास या शेअरची कामगिरी अधिक प्रभावी असून, या कालावधीत शेअरची किंमत २१.४० रुपयांवरून ५५ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, त्यात १६० टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. २९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या किंमतीची आजच्या किंमतीशी तुलना केल्यास या शेअरमध्ये तब्बल ३४०० टक्क्यांनी वाढ दिसते.

मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचा निकाल

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीनं नुकतेच आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ६.०६ कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत हा नफा २.९५ कोटी रुपये होता.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा २२.३७ कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षात नफ्याचा हाच आकडा ८.७६ कोटी रुपये होता. म्हणजेच नुकत्याच संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक १५५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

वन पॉईंट वन सोल्युशन्स लिमिटेडनं आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत एकूण ४२.६१ कोटी रुपयांचं उत्पन्न नोंदवलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न १६५.९६ कोटी रुपयांवरून १४४.२० कोटी रुपयांपर्यंत वाढलं. ही वाढ सुमारे १५ टक्के आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील लेखात व्यक्त केलेली मते आणि शिफारशी विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांची वैयक्तिक मतं आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी संबंधित योग्य सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner