World Economic Forum : दावोस शहरात एका रात्रीच्या मुक्कामाचं भाडं १ लाखापासून १९ लाख रुपयापर्यंत… Airbnb ची चांदी!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  World Economic Forum : दावोस शहरात एका रात्रीच्या मुक्कामाचं भाडं १ लाखापासून १९ लाख रुपयापर्यंत… Airbnb ची चांदी!

World Economic Forum : दावोस शहरात एका रात्रीच्या मुक्कामाचं भाडं १ लाखापासून १९ लाख रुपयापर्यंत… Airbnb ची चांदी!

Jan 21, 2025 12:58 PM IST

स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात आजपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक सुरू होतय. या बैठकीत सामील होण्यासाठी जगभरातील उद्योग क्षेत्रातील दिग्गजांचं येथे आगमन झालं आहे. हॉटेल्सची भाडी गगनाला भिडली आहेत.

दावोस शहरात एका रात्रीच्या मुक्कामाचं भाडं १ लाखापासून १९ लाख रुपये
दावोस शहरात एका रात्रीच्या मुक्कामाचं भाडं १ लाखापासून १९ लाख रुपये (AFP)

युरोपच्या स्वित्झर्लंड मध्ये दावोस शहरात आजपासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum)ची वार्षिक बैठक सुरू होत आहे. जगभरातील उद्योग-व्यापार आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी येथे दाखल झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे दाखल झाले आहे. या बैठकीत्या पार्श्वभूमीवर दावोस शहरात हॉटेलचे भाडे गगनाला भिडले आहेत. भाड्याने हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देणाऱ्या airbnb या कंपनीची चांदी होत आहे.

‘सेमाफोर’ने दिलेल्या वृत्तानुसार दावोस शहरात कॉमन टॉयलेट आणि बाथरूम असलेल्या अपार्टमेंटचे एका रात्रीचे भाडे १ लाख रुपये झाले आहे. अधिक लक्झरी हॉटेलमध्ये एका रुमसाठी एका रात्रीसाठी तब्बल १९ लाख रुपयांपर्यंत मोजावे लागत आहे.

दावोसमध्ये airbnb कंपनीची चांदी!

दावोस शहरात २० ते २५ जानेवारी दरम्यान सर्वच हॉटेल आणि फ्लॅटचे भाडे गगनाला भिडले असल्याचे वृत्त 'सेमाफोर'ने दिले आहे. अनेक लोक airbnbद्वारे फ्लॅट आणि हॉटेल बुक करत आहेत. airbnb च्या अॅपवर शेअर टॉयलेट बाथरून असलेल्या फ्लॅटचे एका रात्रीचे भाडे १ लाख रुपये झाले आहे. 

शिवाय, कॅम्पर व्हॅनची निवड केल्यास दोन पाहुण्यांच्या कॅम्पर व्हॅनची किंमत एका रात्रीसाठी १,५२६ डॉलर म्हणजेच अंदाजे १.३२ लाख रुपये एवढे आहे.

Airbnb prices during Jan 20-24 in Davos
Airbnb prices during Jan 20-24 in Davos

एका स्टुडिओ अपार्टमेंटचे भाडे ३,३५२ डॉलर म्हणजेच तब्बल २ लाख ९० हजार रुपये रुपये आहे. ऐरवी, ऑफ सिजनमध्ये या स्टुडिओ अपार्टमेंटचे भाडे २५० डॉलर म्हणजे २१ हजार रुपये असते, अशी माहिती 'सेमाफोर'ने दिली आहे.  साडेतीन खोल्यांच्या फ्लॅटच्या भाड्याच्या दरातही प्रचंड वाढ झाली आहे. या फ्लॅटचे एका रात्रीचे भाडे ५,३६५ डॉलर म्हणजेच सुमारे ४.६४ लाख रुपये एवढे झाले आहे. याउलट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक संपल्यानंतर, पुढच्याच आठवड्यात याच फ्लॅटचे एका रात्रीचे भाडे ३८,००० रुपयांपेक्षा दर्शवण्यात आले आहे.

डबल बेडरूम फ्लॅटचे एका रात्रीचे भाडे ८ लाख रुपये

दरम्यान, दोन बेडरूमच्या अपार्टमेंटचे एका रात्रीचे भाडे ९,०३३ डॉलर (७.८१ लाख रुपयांपेक्षा जास्त) आहे. तर दोन बेडरूमच्या लक्झरी अपार्टमेंटचे भाडे १७,४३२ डॉलर (१५ लाख रुपयांपेक्षा जास्त) दर्शवण्यात आले आहे. ऐरवी दावोसमध्ये दोन बेडरूम अपार्टमेंटचे भाडे ३६५ डॉलर म्हणजेच सुमारे ३८ हजार रुपये एवढे असते. तीन बेडरूमच्या पेंटहाऊसचे एका रात्रीचे भाडे तब्बल २२,४२६ डॉलर (१९ लाख रुपयांपेक्षा अधिक) झाले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये यंदा भारतातून कोणकोण सामील होणार

यंदा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू देखील दावोसला गेले आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये व्हिडिओ कॉन्फ्रंसद्वारे संवाद साधणार आहे. त्यांच्याव्यतिरिक्त युरोपियन महासंघाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष मटामेला सिरिल रामाफोसा, स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की इत्यादी नेते सहभाग घेणार आहे.

Whats_app_banner