मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IT Raid news : रोल्स रॉइस, लॅम्बोर्गिनी, पोर्शे... इन्कम टॅक्सच्या छाप्यात मिळाल्या लक्झरी कार

IT Raid news : रोल्स रॉइस, लॅम्बोर्गिनी, पोर्शे... इन्कम टॅक्सच्या छाप्यात मिळाल्या लक्झरी कार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 01, 2024 04:05 PM IST

Income Tax Raid in News : उत्तर प्रदेशच्या कानपूर (Kanpur) येथील बन्सीधर टोबॅको (Bansidhar Tobacco) कंपनीवर प्राप्तिकर विभागानं टाकलेल्या छाप्यांमध्ये आलिशान गाड्यांचं घबाड हाती लागलं आहे.

उत्तर प्रदेशातील बन्सीधर टोबॅको कंपनीवर इन्कम टॅक्सचे छापे; रोल्स रॉइस, पोर्शे, लॅम्बोर्गिनी गाड्या जप्त
उत्तर प्रदेशातील बन्सीधर टोबॅको कंपनीवर इन्कम टॅक्सचे छापे; रोल्स रॉइस, पोर्शे, लॅम्बोर्गिनी गाड्या जप्त

Income Tax raid in Delhi UP : एका तंबाखू कंपनीच्या विरोधातील तपासाचा भाग म्हणून प्राप्तिकर विभागानं दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये छापे टाकले आहेत. कंपनीच्या मालकाच्या दिल्लीत घरातून प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ६० कोटी रुपयांच्या अनेक आलिशान गाड्या आढळून आल्या. या गाड्यांमध्ये रोल्स रॉयस, पोर्शे, लॅम्बोर्गिनी, फेरारी, मॅक्लारेन यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. 

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील बन्सीधर टोबॅको (Banisdhar Tobacco) कंपनीवर प्राप्तीकर विभागानं कारवाईचा बडगा उगारल आहे. 'एनडीटीव्ही'नं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीमध्ये मोठी आर्थिक अफरातफर झाली आहे. त्या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभागानं कानपूर, दिल्ली, मुंबई, गुजरातसह कंपनीच्या २० ठिकाणच्या मालमत्तांवर छापे टाकले आहेत.

तपासादरम्यान कंपनीच्या प्रत्यक्ष आणि घोषित उलाढालीत मोठी तफावत असल्याचं समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं. प्राप्तिकर विभागाच्या १५ ते २० पथकांनी बन्सीधर टोबॅको कंपनीच्या मालमत्तांवर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या झाडाझडतीमध्ये ६० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या कार सापडल्या. त्यात १६ कोटी रुपयांची रोल्स रॉयस फँटम आहे. दिल्लीतील पॉश भागातील वसंत विहार येथील शिवम मिश्रा (Shivam Mishra) यांच्या घरी ही कार आढळली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी छाप्यातून आलिशान गाड्यांबरोबरच ४.५ कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे. त्याचबरोबर अनेक महत्त्वाची कागदपत्रंही तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत. या कंपनीनं केवळ इन्कम टॅक्सच्याच नियमांचं उल्लंघन केलं असं नाही तर जीएसटीच्या (GST) बाबतीतही फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

काय आहे संशय?

बन्सीधर टोबॅको प्रायव्हेट लिमिटेड ही तंबाखू उद्योगातील एक प्रमुख कंपनी मानली जाते. ही कंपनी आपली उत्पादनं अनेक पान मसाला विक्री करणाऱ्या समूहांना पुरवते. हा संपूर्ण तपास तंबाखू व्यवसायाशी संबंधित उद्योजक केके मिश्रा यांच्या भोवती केंद्रीत आहे. कंपनीची उलाढाल अनेक पटींनी झाली आहे, मात्र प्रत्यक्षात ती खूप कमी दाखवण्यात आली आहे. त्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा इन्कम टॅक्स बुडवल्याची अधिकाऱ्यांची माहिती आहे.

दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच 

गुरुवारी सकाळी प्राप्तिकर विभागाचे अधिकारी कानपूरमधील नयागंज इथं पोहोचले आणि दुपारी दीडच्या सुमारास छाप्याची कारवाई सुरू करण्यात आली. अधिकाऱ्यांनी तिथं उपस्थित कर्मचाऱ्यांचे मोबाइल काढून घेतले. आयटीचा छापा सुरू होताच एकच खळबळ उडाली. अनेक तास ही छापेमारी सुरू होती. आज दुसऱ्या दिवशीही इन्कम टॅक्सचे हे धाडसत्र सुरूच होते.

 

WhatsApp channel

विभाग