RIL AGM 2024 : बाजार मूल्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. 'जिओ टीव्हीवर यापुढं १० भाषा आणि २० जॉनरसह ८६० हून अधिक चॅनेल्स पाहता येतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजनं आज केली.
रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत काय घोषणा होतात याची उत्सुकता जशी गुंतवणूकदारांना होती, तशीच ती सर्वसामान्य ग्राहकांनाही होती. विशेषत: जिओचे ग्राहक या सभेकडं लक्ष लावून बसले होते. त्यांच्यासाठी देखील कंपनीनं अनेक घोषणा केल्या आहेत.
जिओ फायबर आणि जिओ एअर फायबरच्या ग्राहकांना जिओ सिनेमा प्रीमियमसह, डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी ५ आणि फॅनकोड सारख्या १३ लोकप्रिय ओटीटी अॅप्सचा कंटेंटचा वापर करू शकतात, असं कंपनीनं आधीच स्पष्ट केलं आहे. यापूर्वी जिओ फायबर आणि जिओ एअर फायबर कनेक्शनसह केवळ जिओ सेट टॉप बॉक्सद्वारे उपलब्ध असलेले जिओ टीव्ही+ अॅप आता सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. त्याशिवाय, जिओ टीव्हीवर ८६० चॅनेल पाहता येणार आहेत. तसंच, पाहायची राहून गेलेली सीरियल सात दिवसांत कधीही पाहता येण्याची सुविधाही मिळणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ही मानव जातीच्या उत्क्रांतीतील सर्वात क्रांतिकारी घटना आहे. मानवजातीसमोरील अनेक गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्याच्या संधी त्यामुळं उपलब्ध झाल्या आहेत, असं मुकेश अंबानी यावेळी म्हणाले. रिलायन्स आता तंत्रज्ञानाची उत्पादक बनली आहे आणि डीप टेक कंपनीमध्ये रूपांतरित झाली आहे, असं अंबानी म्हणाले.
मुकेश अंबानी यांनी आपल्या एआय व्हिजनच्या अनुषंगानं जिओ एआय-क्लाउड वेलकम ऑफरची घोषणा केली. त्या अंतर्गत जिओ युजर्सना या दिवाळीपासून १०० जीबीपर्यंत विनामूल्य क्लाऊड स्टोरेज मिळेल. क्लाउड डेटा स्टोरेज आणि एआय सेवा अधिक परवडणारी आणि सर्वांसाठी सुलभ करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे, असं अंबानी म्हणाले.
भारत हे जगातील सर्वात मोठं ग्रोथ इंजिन आहे. तो आता केवळ वाहक राहिलेला नाही, असंही अंबानी म्हणाले. 'कमीत कमी कालावधीत जास्त नफा कमवणं हे रिलायन्सचं उद्दिष्ट नाही. रिलायन्स समूहातील तेल ते दूरसंचार कंपन्या अल्प मुदतीत नफा कमवण्याचा व संपत्ती जमवण्याचा व्यवसाय करत नाहीत. देशासाठी संपत्ती निर्मितीवर आमचा भर आहे, असं मुकेश अंबानी यांनी यावेळी स्पष्ट केलं.