IPO Listing Today : बाजारात सूचीबद्ध होताच शेअर विकण्यासाठी धावाधाव, १११ रुपयांवर आला भाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  IPO Listing Today : बाजारात सूचीबद्ध होताच शेअर विकण्यासाठी धावाधाव, १११ रुपयांवर आला भाव

IPO Listing Today : बाजारात सूचीबद्ध होताच शेअर विकण्यासाठी धावाधाव, १११ रुपयांवर आला भाव

Published Aug 29, 2024 12:14 PM IST

Resourceful Automobile share price : रिसोर्सफुल ऑटोमोबाइल कंपनीचा आयपीओ आज शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झाला. मात्र, पहिल्या दिवशी गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग झाला आहे.

Resourceful Automobile ipo listing : बाजारात सूचीबद्ध होताच शेअर विकण्यासाठी धावाधाव
Resourceful Automobile ipo listing : बाजारात सूचीबद्ध होताच शेअर विकण्यासाठी धावाधाव

IPO Listing today : रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सचा आयपीओ आज मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाला. मात्र, या आयपीओचं बाजारानं अपेक्षेपेक्षा थंड स्वागत केलं. आयपीओमध्ये १७७ रुपयांना इश्यू झालेला हा शेअर ११७ रुपयांवर सूचीबद्ध झाला. त्यामुळं विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि शेअर ४.९ टक्क्यांनी घसरला. मात्र, काही वेळातच पुन्हा तो वधारला व १२२.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

रिसोर्सफुल ऑटोमोबाईल्सचा आयपीओ २२ ऑगस्ट रोजी खुला झाला होता. सबस्क्रिप्शनसाठी २६ ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. एसएमई आयपीओची किंमत १२ कोटी रुपये होती आणि हा आयपीओ सुमारे ५०० पट सब्सक्राइब झाला होता. मात्र, सबस्क्रिप्शनच्या तुलनेत बाजारात त्याला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक नव्हता.

काय करते ही कंपनी? 

२०१८ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी साहनी ऑटोमोबाईल या ब्रँडच्या नावानं व्यवसाय करते. ही कंपनी यामाहाशी संबंधित आहे. दुचाकी वाहनांची विक्री आणि सर्व्हिसिंगचा कंपनीचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी २८ डिसेंबरपर्यंत कंपनीचे दोन शोरूम आणि आठ कर्मचारी होते. या इश्यूमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर राजधानी दिल्लीत नवीन शोरूम उघडण्यासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी, वर्किंग कॅपिटलच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर औद्योगिक उद्देशांसाठी केला जाणार आहे. 

आयपीओला भरघोस प्रतिसाद

या आयपीओला गुंतवणूकदारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. कंपनीनं ९.७६ लाख शेअर्स विक्रीसाठी काढले होते. प्रत्यक्षात ४०.७६ कोटी शेअर्ससाठी बोली लागली. म्हणजेच तीन दिवसांत हा आयपीओ तब्बल ४१९ वेळा सब्सक्राइब झाला. एसएमई आयपीओ पहिल्या दिवशी १०.३५ पट आणि दुसऱ्या दिवशी ७४.१३ पट सब्सक्राइब झाला. एकूणच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार वर्गाला ३१५.६१ पट, तर किरकोळ गुंतवणूकदार वर्गाला ४९६.२२ पट सब्सक्रिप्शन मिळालं.

सेबीनं केलं सावध

सेबीच्या (SEBI) पूर्णवेळ सदस्य अश्विनी भाटिया यांनी चार्टर्ड अकाऊंटंटना एसएमई एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध कंपन्यांचे ऑडिट करताना अधिक सावधगिरी बाळगण्यास सांगितलं आहे. सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच यांनीही मार्चमध्ये एसएमई प्लॅटफॉर्मवरील लिस्टिंग आणि ट्रेडिंगमधील किंमतीतील फेरबदलाविषयी चिंता व्यक्त केली होती आणि गुंतवणूकदारांना सावध राहण्यास सांगितलं होतं.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

Whats_app_banner